नांदेडमध्ये भीषण अपघात! कार थेट मन्याड नदीत कोसळली; पत्नीचा बुडून मृत्यू, पती बचावला
कंधार तालुक्यातील बहादरपूर पुलावरील घटना; मध्यरात्री दोन वाजता घडली दुर्घटना
चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट पुलावरून मन्याड नदीत कोसळल्याची दुर्दैवी घटना नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बहादरपूर पुलावर घडली. या अपघातात पार्वतीबाई गुट्टे यांचा नदीत बुडून मृत्यू झाला, तर त्यांचे पती लक्ष्मण गुट्टे यांना पोहता येत असल्याने त्यांनी पाण्याबाहेर येत आपला जीव वाचवला. ही घटना मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण गुट्टे आणि त्यांच्या पत्नी पार्वतीबाई गुट्टे हे नांदेडहून मुखेड तालुक्यातील सावरगाव वाडीकडे कारने जात होते. प्रवासादरम्यान कंधार तालुक्यातील बहादरपूर पुलावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट पुलावरून मन्याड नदीच्या पाण्यात कोसळली.
कार नदीत कोसळताच लक्ष्मण गुट्टे यांनी पोहता येत असल्यामुळे पाण्याबाहेर येत आपला जीव वाचवला. मात्र, पार्वतीबाई गुट्टे यांना बाहेर पडता न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बचावकार्य करण्यात आले. क्रेनच्या साह्याने नदीत कोसळलेली कार बाहेर काढण्यात आली. तसेच पार्वतीबाई गुट्टे यांचा मृतदेहही नदीतून बाहेर काढण्यात आला. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेमुळे गुट्टे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



