समृद्धी महामार्गावर ट्रकला भीषण आग; दोघांचा जळून मृत्यू

टायर फुटल्याने ट्रकची बॅरियरला धडक; चालकासह एकाचा मृत्यू, क्लीनर बचावला
समृद्धी महामार्गावर रविवारी (दि. १२ ऑक्टोबर) पहाटे झालेल्या भीषण अपघातात ट्रकला आग लागून दोघांचा मृत्यू झाला. नागपूर कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक १२७+३०० जवळ ही दुर्घटना घडली. ट्रकचा समोरील टायर फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक क्रॉस बॅरियरला धडकला. या धडकेनंतर डिझेल टँक फुटून ट्रकने पेट घेतला. या आगीत चालकासह अन्य एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर क्लीनरने चालत्या ट्रकमधून उडी मारल्याने त्याचे प्राण वाचले. ही घटना तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून पाटण्याच्या दिशेने गोबी घेऊन ट्रक क्रमांक RJ-11-GC-7383 समृद्धी महामार्गावरून जात होता. रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास चालकाच्या बाजूचा पुढील टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक क्रॉस बॅरियरला धडकून पुढे घासत गेला. या अपघातात ट्रकची डिझेल टँक फुटल्याने वाहनाला भीषण आग लागली.
या दुर्घटनेत ट्रकचालक इखलास खान शहाबुद्दीन खान (वय २२) आणि जाहुल खान अली खान (वय २५), दोघेही रा. राणी आला खुर्द, पलवल, हरियाणा, यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, यापैकी एक जण ट्रकमधून पुलाखाली पडला, तर चालकाचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आगीच्या तीव्रतेमुळे दोघांनाही जीव गमवावा लागला.
ट्रकमधील क्लीनर साहिब सईद खान (वय १८, रा. पलवल, हरियाणा) याने प्रसंगावधान राखत चालत्या ट्रकमधून उडी मारली. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. त्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पथक (IC-07, धामणगाव) आणि तळेगाव दशासर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किरण औटे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या मदतीने ट्रकला लागलेली आग विझवण्यात आली. दोन्ही मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
दरम्यान, क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रक बाजूला हटवण्यात आला आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी तळेगाव दशासर पोलीस पुढील तपास करीत आहेत.



