AccidentNewsBuldhanacitynews

मेहकर बायपास चौफुलीवर भीषण अपघात; माजी सैनिकाचा जागीच मृत्यू

आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; तासभर रुग्णवाहिका न पोहोचल्याने नागरिकांमध्ये संताप

मेहकर शहरातील बायपास चौफुलीवर रविवारी (दि. ११ ऑक्टोबर) सायंकाळी ७ ते ७.३० वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका माजी सैनिकाचा जागीच मृत्यू झाला. अच्युतराव शिरसाट (रा. वडगाव तेजन, ता. लोणार) असे मृत माजी सैनिकाचे नाव आहे. त्यांच्या दुचाकीला भरधाव आयशर वाहनाने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघातानंतर तब्बल एक तास उलटूनही १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी न पोहोचल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अच्युतराव शिरसाट हे रविवारी सायंकाळी मेहकर येथून दुचाकीने वडगाव तेजन या आपल्या गावाकडे जात होते. यावेळी मेहकर बायपास चौफुलीवर आयशर वाहन क्रमांक MH-26-BE-1044 ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकी थेट आयशर वाहनाखाली गेली. या दुर्घटनेत शिरसाट यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीचा क्रमांक MH-28-AV-9078 असल्याची माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त आयशर वाहन पोलिसांनी मेहकर पोलीस ठाण्यात नेले. दरम्यान, अपघातानंतर तातडीने १०८ रुग्णवाहिकेला संपर्क करण्यात आला होता. मात्र, जवळपास एक तास उलटूनही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात आला.

मेहकर बायपास हा नागपूर–छत्रपती संभाजीनगर मार्गावरील महत्त्वाचा रस्ता आहे. या चौफुलीवरून अंत्री देशमुख, मेहकर शहर तसेच सुलतानपूर आणि लोणारकडे जाण्यासाठी मार्ग उपलब्ध आहेत. या परिसरात चोवीस तास वाहनांची वर्दळ असते. चौफुलीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर ग्रामीण रुग्णालयही आहे.

मात्र, या ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने तसेच गतिरोधक आणि पथदिव्यांची पुरेशी व्यवस्था नसल्याने अपघातांचा धोका वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. चौफुलीवरील अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या भीषण अपघातानंतर बायपास चौफुलीवरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. चौफुलीवर आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना करणे, पथदिवे बसविणे, गतिरोधक किंवा अन्य योग्य वाहतूक नियंत्रक उपाय लागू करणे आणि आपत्कालीन सेवांची तत्परता सुनिश्चित करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच रुग्णवाहिका वेळेवर का पोहोचली नाही, याची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button