नागपूर-काटोल मार्गावर भीषण अपघात; अल्टो कार पलटी होऊन आगीच्या भक्ष्यस्थानी

फेटरी हनुमान मंदिराजवळ कारला अचानक आग; जखमीला कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयातून नागपूरला हलवले
नागपूर : नागपूर-काटोल मार्गावरील फेटरी हनुमान मंदिराजवळ अल्टो कारचा भीषण अपघात झाल्याची घटना ७ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. भरधाव कार पलटी झाल्यानंतर अचानक वाहनाने पेट घेतला. या अपघातात काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून, एका जखमीला उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे
नागपूर-काटोल मार्गावर फेटरी हनुमान मंदिराजवळ ७ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे सात वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. नागपूरच्या दिशेने जात असलेली MH 31 CM 8977 क्रमांकाची अल्टो कार अचानक पलटी झाली. त्यानंतर काही क्षणांतच कारने पेट घेतल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली.

प्राथमिक माहितीनुसार, अपघाताच्या वेळी कारमध्ये प्रवासी होते. या दुर्घटनेत काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींपैकी पंकज कोसे, रा. दहा नंबर पुलिया, कामठी रोड, नागपूर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच देव्यांशी फाउंडेशनच्या ॲम्बुलन्स टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमीला कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले.
दरम्यान, अपघातानंतर कारने पेट घेतल्याने आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न करून वाहनाला लागलेली आग नियंत्रणात आणली.
या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कळमेश्वर पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू असून, वाहन पलटी होण्यामागचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.



