
राज्यभरातील विद्यार्थी आणि शिक्षकांचा सहभाग; गायन, नृत्य, वादन, चित्रकला, नाटकासह विविध स्पर्धांचे आयोजन
वाशिम : वाशिम येथील नवोदय विद्यालयात राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. राज्यभरातील नवोदय विद्यालयांमधील विद्यार्थी आणि शिक्षक या महोत्सवात सहभागी झाले असून, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

वाशिमच्या नवोदय विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवात राज्यातील विविध नवोदय विद्यालयांमधील विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळावी आणि विविध कला प्रकारांमध्ये त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करता यावी, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवात गायन, नृत्य, वादन, चित्रकला, मूर्तिकला, नाटक आणि भाषण अशा विविध कला प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांकडून विविध कला प्रकारांचे सादरीकरण केले जात असून, त्यांच्या कलागुणांना उपस्थितांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील टप्प्यात राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा महोत्सव केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न राहता राष्ट्रीय पातळीवर आपली प्रतिभा सिद्ध करण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. पुढील दोन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कला सादरीकरणे आणि स्पर्धांमुळे नवोदय विद्यालयाचा परिसर विद्यार्थ्यांच्या उत्साहाने गजबजून जाणार आहे.

राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासोबतच इतर विद्यार्थ्यांकडून शिकण्याची आणि स्पर्धात्मक अनुभव घेण्याची संधी मिळत आहे. या महोत्सवातून राष्ट्रीय स्तरासाठी कोणते विद्यार्थी निवडले जातात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



