citynewsMaharashtraWardha

22 वर्षांची परंपरा तुटली; यंदा तलावाच्या मध्यभागी नाही, तर काठावर विराजमान होणार दुर्गादेवी

वर्धा जिल्ह्यातील तळेगाव टालातुले येथील तलावाची ओळखच बनली होती ती नवरात्रोत्सवातील अनोख्या दुर्गादेवी स्थापनेमुळे. गेल्या 22 वर्षांपासून तलावाच्या मध्यभागी, पाण्याच्या सान्निध्यात भव्य मंच उभारून दुर्गादेवीची स्थापना केली जात होती. मात्र यंदा कमी पावसामुळे तलावातील पाणीसाठा कमी झाला आणि ही 22 वर्षांची परंपरा खंडित झाली आहे. नेमकं काय घडलं आणि यंदा कुठे विराजमान होणार आहेत दुर्गादेवी, पाहूया हा विशेष रिपोर्ट…

वर्धा जिल्ह्यातील तळेगाव टालातुले येथील तलावाची नवरात्रोत्सवात एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. गेल्या 22 वर्षांपासून याच तलावाच्या मध्यभागी दुर्गादेवीची भव्य स्थापना केली जात होती. तलावात 15 ते 20 फूट पाणी असतानाही विशेष मंच आणि मंडप उभारून देवीची प्रतिष्ठापना केली जायची.

रात्रीच्या वेळी आकर्षक रोषणाईने सजलेला तलाव आणि पाण्याच्या मध्यभागी विराजमान झालेली दुर्गादेवी पाहण्यासाठी परिसरातीलच नव्हे, तर दूरवरूनही भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने तळेगाव टालातुले येथे दाखल होत होते. या अनोख्या देवी स्थापनेची वर्षभर भाविकांकडून प्रतीक्षा केली जायची.

मात्र यंदा परिस्थिती बदलली आहे. कमी पावसामुळे तलावात अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे तलावाच्या मध्यभागी मंच उभारणे सुरक्षित राहणार नसल्याने मंडळाला 22 वर्षांची ही परंपरा यंदा खंडित करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.

तलावातील पाणीसाठा कमी झाल्याने गावकऱ्यांमध्ये सुरुवातीला हळहळ व्यक्त करण्यात आली. कारण तलाव आणि त्याच्या मध्यभागी होणारी दुर्गादेवीची स्थापना ही तळेगाव टालातुलेच्या नवरात्रोत्सवाची खास ओळख बनली होती.

मात्र परिस्थितीसमोर न झुकता ग्रामस्थांनी श्रद्धा आणि उत्साह कायम ठेवत नवा पर्याय निवडला आहे. यंदा दुर्गादेवी तलावाच्या मध्यभागी नव्हे, तर तलावाच्या काठावर भव्य मंडप उभारून विराजमान होणार आहेत.

तलावातील पाणीसाठा आटला असला, तरी ग्रामस्थांची आस्था मात्र कायम आहे. 22 वर्षांची परंपरा परिस्थितीमुळे बदलली असली, तरी भक्तीचा उत्साह आणि नवरात्रोत्सवाचा जल्लोष कायम ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button