उंदरी धरणात अवघा 20 ते 25 टक्के पाणीसाठा; कामरगाववर पाणीटंचाईचे सावट

जूनपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आरक्षित ठेवण्याचा निर्णय; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाववर आता पाणीटंचाईचं मोठं संकट घोंघावत आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या उंदरी प्रकल्पात अवघा 20 ते 25 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. आगामी उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता जूनपर्यंत पुरेल एवढं पाणी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कामरगावकरांसमोर पाणी बचतीचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या उंदरी प्रकल्पातील पाणीसाठा आता अवघ्या 20 ते 25 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

धरणातून अवैध पाणीउपसा होत असल्याच्या, तसेच रात्री वीजपुरवठा खंडित करून पाणीपुरवठा थांबवला जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत विशेष समितीने धरण परिसराची अचानक पाहणी केली. मात्र पाहणीदरम्यान कोणताही बेकायदेशीर प्रकार आढळून आला नाही.
तरीही धरणातील घटता पाणीसाठा प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. आगामी उन्हाळ्याचा विचार करता पाटबंधारे विभाग आणि प्रशासनाने जून महिन्यापर्यंत पुरेल एवढा पिण्याच्या पाण्याचा साठा आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामपंचायतीकडूनही पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करण्यात येत असून, संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन उपाययोजनांनाही सुरुवात करण्यात आली आहे.

दरम्यान, नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नळ विनाकारण सुरू ठेवणे, पिण्याच्या पाण्याने वाहने धुणे आणि अंगणात पाणी मारणे टाळावे, तसेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



