लकडगंज पोलिसांची गुटख्याविरोधात कारवाई; महाराष्ट्र प्रतिबंधित गुटखा जप्त

पान मसाला, गुटखा आणि प्रतिबंधित सिगारेटसह रोख रक्कम जप्त; एकावर गुन्हा दाखल
नागपूर : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर लकडगंज पोलिसांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणात गुटखा, पान मसाला आणि प्रतिबंधित सिगारेट जप्त केली आहे. या कारवाईत रोख रकमेसह सुमारे 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 सप्टेंबर रोजी रात्री पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या एस्कॉर्ट पथकाला शहरात पेट्रोलिंग करत असताना सतनामी नगर चौक परिसरातील हिरापान पॅलेस येथे महाराष्ट्र प्रतिबंधित पान मसाला गुटखा तसेच प्रतिबंधित सिगारेटची चोरीछुपी विक्री होत असल्याची माहिती मिळाली.
माहितीची खात्री झाल्यानंतर एस्कॉर्ट पथक प्रमुख API भगवान कोळी यांच्यासह पथकाने संबंधित ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर लकडगंज पोलीस ठाण्याचे राजपत्रित अधिकारी मपोउपनि सोनल शिंदे यांना माहिती देण्यात आली. पंचांच्या उपस्थितीत संशयिताची झडती घेण्यात आली.
यावेळी बादल कोटके, वय 25 वर्षे, रा. भारतवाडा, पुनापूर, पारडी, नागपूर याच्याकडून महाराष्ट्रात प्रतिबंधित सुगंधित पानमसाला आणि गुटखा जप्त करण्यात आला.
जप्त गुटख्यामध्ये विमल, राजश्री, पान पराग, बाबा नवरतन आणि रजनीगंधा या ब्रँडचे लहान-मोठे पुडे आढळून आले. यासोबत प्रतिबंधित सिगारेट आणि 26 हजार 630 रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 95 हजार रुपये असल्याची माहिती दिली आहे.
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून बादल कोटके याच्याविरुद्ध लकडगंज पोलीस ठाण्यात प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस्कॉर्ट पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान कोळी, मपोउपनि सोनल शिंदे, पोहेकॉ अनुप लोलुसरे, तसेच आशिष गायकधने, अशिर्व शेख, दिनेश क्षीरसागर, सोनू सोनवणे आणि चंद्रकांत मेहत्रे यांनी केली.
दरम्यान, नागपूर शहरात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू असून, या प्रकरणातील पुढील तपास लकडगंज पोलीस करीत आहेत.



