अमरावती शिक्षक मतदारसंघात 54 नामांकन अर्ज दाखल; प्रत्यक्ष उमेदवार 30

आज नामांकनाची अंतिम मुदत; उद्या छाननी, 9 ऑक्टोबरला माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार
अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज, 6 ऑक्टोबर रोजी संपली. उपलब्ध अंतिम आकडेवारीनुसार, या निवडणुकीसाठी एकूण 54 नामांकन अर्ज दाखल झाले असून, काही उमेदवारांनी दोन तर काहींनी तीन अर्ज दाखल केल्याने प्रत्यक्ष उमेदवारांची संख्या 30 असल्याचे सांगण्यात आले आहे.
काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार अदिती ऋषिकेश पोहरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्याचबरोबर महायुतीतील काही बंडखोर उमेदवारांनीही स्वतंत्रपणे अर्ज दाखल केल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणांकडे लक्ष लागले आहे.
प्रमुख उमेदवारांनी दाखल केले अर्ज
आजपर्यंत नामांकन दाखल केलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये अदिती प्रकाश पोहरे, संगीता शिंदे, उपेंद्र बाबाराव कडू, नितीन आगे, अनिल काळे, रामदास कटक, किरण अर्जुन चौधरी, प्रीती हर्षल रेवणे, प्रा. डॉ. संतोष श्रीकृष्ण हुशे आणि चंद्रशेखर भोयर यांचा समावेश आहे.
राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे किरण सरनाईक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दत्तात्रय श्रीराम लहाने, भारतीय जनसम्राट पार्टीचे गजानन ढोके, काँग्रेसच्या अदिती ऋषिकेश पोहरे, राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीच्या प्रीती हर्षल रेवणे, बळीराजा पार्टीचे प्रा. अनिल मधुकरराव काळे आणि वंचित बहुजन आघाडीचे गाजी मोहम्मद जहरोश यांचा समावेश आहे.
याशिवाय अनेक उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत.
महायुतीतील बंडखोरीची चर्चा
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे किरण सरनाईक हे अधिकृत उमेदवार आहेत. त्याचवेळी शेखर भोयर, संगीता शिंदे आणि सुमित पवार यांनीही स्वतंत्रपणे अर्ज दाखल केल्याने महायुतीतील अंतर्गत समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. संगीता शिंदे यांनी यापूर्वीही स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती.
दरम्यान, काँग्रेसने अदिती पोहरे यांना तर ठाकरे गटाने दत्तात्रय लहाने यांना उमेदवारी दिल्याने महाविकास आघाडीतील पक्षही स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत.
उद्या नामांकन पत्रांची छाननी
आता 7 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. त्यानंतर 9 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे माघारीची मुदत संपल्यानंतरच प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार राहणार, हे स्पष्ट होईल.
23 ऑक्टोबरला मतदान
निवडणूक कार्यक्रमानुसार 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी केली जाणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. दिलेल्या आकडेवारीनुसार या मतदारसंघात एकूण 30 हजार 896 शिक्षक मतदार आहेत.
यामध्ये अमरावतीमध्ये 8 हजार 636, अकोल्यात 5 हजार 465, बुलढाण्यात 6 हजार 730, वाशिममध्ये 3 हजार 488 आणि यवतमाळमध्ये 6 हजार 577 मतदारांचा समावेश आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. नयना गुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचही जिल्ह्यांतील प्रशासन निवडणूक प्रक्रिया पार पाडत आहे. पाच जिल्हाधिकारी, 27 उपविभागीय अधिकारी आणि 56 तहसीलदार निवडणुकीच्या कामकाजात सहभागी असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आता 7 ऑक्टोबरच्या छाननीनंतर पात्र उमेदवारांचे चित्र स्पष्ट होईल आणि 9 ऑक्टोबरला उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.



