बंदुकीचा धाक दाखवत ढोमणे ज्वेलर्समध्ये सशस्त्र दरोडा

चार दरोडेखोरांनी दुकानाचे शटर बंद करून लुटले दागिने; नोकराला फरफटत नेल्याने जखमी
अमरावती : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ढोमणे ज्वेलर्समध्ये भरदिवसा सशस्त्र दरोडा पडल्याने खळबळ उडाली आहे. मोटारसायकलवरून आलेल्या चार अज्ञात दरोडेखोरांनी दुकानाचे शटर बंद करून बंदुकीचा धाक दाखवत सोन्या-चांदीचे दागिने लुटल्याची घटना दुपारी पावणे चारच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, चार दरोडेखोर मोटारसायकलवरून ढोमणे ज्वेलर्समध्ये दाखल झाले. दुकानात प्रवेश केल्यानंतर त्यांनी शटर बंद केले आणि तेथील नोकराला बंदुकीचा धाक दाखवला. त्यानंतर दुकानातील तिजोरी तसेच नोकराकडील सोन्या-चांदीचे दागिने एका बॅगेत भरून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
आरोपींना पकडण्याचा प्रयत्न; नोकर जखमी
दरोडेखोर दुकानातून बाहेर पडून मोटारसायकलवरून नागपूरच्या दिशेने पसार होत असताना दुकानातील नोकर शुभम हाडगे याने आरोपींची मोटारसायकल पकडण्याचा प्रयत्न केला.
मात्र, आरोपींनी मोटारसायकल न थांबवता शुभम हाडगे यांना काही अंतर फरफटत नेल्याने ते जखमी झाले. त्यानंतर आरोपी वेगाने नागपूरच्या दिशेने पसार झाले.
वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. डीसीपी ऋषिकेश सिगारेड्डी, एसीपी यशवंत नरवाडे आणि ठाणेदार बाबुराव राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्यामध्ये एका आरोपीचा चेहरा स्पष्टपणे दिसत असल्याची माहिती आहे. इतर आरोपींनी हेल्मेट आणि स्कार्फ परिधान केल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत असल्याचे सांगण्यात आले.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून, त्यांच्या हालचालींचा माग काढण्यासाठी विविध पथके कामाला लागली आहेत.
व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानात बंदुकीचा धाक दाखवून दरोडा पडल्याने परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची गंभीर दखल घेत सराफा असोसिएशनने आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, दरोडेखोरांनी नेमका किती मुद्देमाल लुटला, याचा तपशील पोलिसांकडून पंचनामा आणि तपासानंतर स्पष्ट होणार आहे. एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.



