70 तोळे सोने आणि डॉलरच्या आमिषाने 20 लाखांची फसवणूक; नागपुरात गुजरातमधील 7 जण ताब्यात

दिल्ली विमानतळावर कस्टमने पकडल्याचे सांगून पैशांची मागणी; गुन्हेशाखा युनिट क्रमांक 3ची मोठी कारवाई
नागपूर : 70 तोळे सोने आणि 70 हजार अमेरिकन डॉलर भारतात घेऊन आलो असून, दिल्ली विमानतळावर कस्टम विभागाने पकडले आहे, असे सांगत एका व्यक्तीला तब्बल 20 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तपास करत गुन्हेशाखा युनिट क्रमांक 3च्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुजरातमधील सात संशयितांना ताब्यात घेतले आहे.
नागपूर शहरातील गणेशपेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला सांगितले की, त्याच्यासाठी 70 तोळे सोने आणि 70 हजार अमेरिकन डॉलर घेऊन एक व्यक्ती भारतात आली आहे. मात्र, दिल्ली विमानतळावर कस्टम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले असून, हे सोने आणि डॉलर सोडवण्यासाठी 13 लाख 92 हजार रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले.
या कथित आमिषाला बळी पडल्यानंतर फिर्यादीने आरोपींवर विश्वास ठेवला. त्यानंतर आरोपींनी खोटे आमिष आणि अधिक नफ्याचे आश्वासन देत वेगवेगळ्या पद्धतीने फिर्यादीकडून तब्बल 20 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला.
नमूद अधिकारी आणि अंमलदारांनी सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण केले. तपासादरम्यान फिर्यादीसह सापळा रचून या गुन्ह्यातील सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान या प्रकरणातील संशयितांचा आंतरराज्य रॅकेटशी संबंध असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. तपासादरम्यान यातील एका संशयिताचा मुंबई येथे संबंध असल्याने त्याला पुढील चौकशीसाठी गुन्हेशाखा युनिट क्रमांक 3च्या पथकाकडे पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आंतरराष्ट्रीय रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा सहभाग आहे का, तसेच या फसवणुकीमागील मुख्य सूत्रधार कोण आहेत, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. मुख्य आरोपींचा तांत्रिक पद्धतीने आणि क्रॉस-चेकच्या माध्यमातून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी एक वाहन, दोन दुचाकी आणि आठ मोबाईल फोन असा एकूण सुमारे 18 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती प्रेसनोटमध्ये देण्यात आली आहे.
या संपूर्ण कारवाईसाठी पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त दीपक अग्रवाल आणि सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्रमांक 3च्या अधिकारी आणि अंमलदारांनी कारवाई केली.
आता या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या सात संशयितांकडून आणखी किती फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येतात, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे आणि या टोळीचा मुख्य सूत्रधार कोण, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.



