शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बुलढाण्यात शेतकरी आक्रोश मोर्चा

हेक्टरी 1 लाख रुपयांच्या मदतीसह विविध मागण्या; मागण्या मान्य न झाल्यास समृद्धी महामार्ग रोखण्याचा आयोजकांचा इशारा
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत आणि मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा यासह जिल्ह्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने शेतकरी, शिवसैनिक आणि पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले.
बैलगाड्या, ट्रॅक्टर, महिला शेतकरी आणि युवक शेतकऱ्यांचा मोठा सहभाग हे या मोर्चाचे विशेष आकर्षण ठरले.
हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत देण्याची मागणी
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली.
तसेच मागील वर्षाची थकीत पीकविमा रक्कम तातडीने अदा करावी, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतजमिनींचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी
शेतीसाठी पूर्ण क्षमतेने आणि सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.
याशिवाय स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनुदान
कर्जमाफीच्या उर्वरित याद्या तातडीने जाहीर कराव्यात, तसेच नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या रकमेत वाढ करण्यात यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
विद्यार्थ्यांची फी माफी आणि पशुधनासाठी चारा छावण्या
शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी विद्यार्थ्यांची फी माफी करण्यात यावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.
तसेच पशुधनासाठी आवश्यक असलेल्या चाऱ्याची उपलब्धता लक्षात घेता चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
मागण्या मान्य न झाल्यास समृद्धी महामार्ग रोखण्याचा इशारा
दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाने तातडीने मान्य केल्या नाहीत, तर येत्या काही दिवसांत समृद्धी महामार्ग जाम करण्याचा लढा उभारण्यात येईल, असा इशारा मोर्चाच्या आयोजकांकडून देण्यात आला.
यावेळी शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या मोर्चाला खासदार अरविंद सावंत, आमदार नितीन बापू देशमुख, जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच प्रवक्त्या जयशीताई शेळके, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, नगराध्यक्ष किशोर गारोळे, उपजिल्हाप्रमुख प्रा. आशिष राहते यांच्यासह शिवसेना, युवासेना आणि विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर शासनाकडून काय निर्णय घेतला जातो आणि मोर्चेकऱ्यांच्या इशाऱ्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा काय असेल, याकडे आता लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष सुरूच राहील, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी एक पाऊल पुढे — असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
सिटी न्यूज | प्रतिनिधी गजानन राऊत | बुलढाणा



