भोकरदनमध्ये लोंबकळत्या वीजतारीचा जीवघेणा धक्का; २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

वाहनाच्या संपर्कात आली विद्युत तार; भावाला वाचवण्यासाठी धावलेल्या भावालाही विजेचा धक्का, गंभीर जखमी
जालना : भोकरदन तालुक्यातील जोमाळा परिसरातून काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. लोंबकळणारी विद्युत तार वाहनाच्या संपर्कात आल्याने झालेल्या दुर्घटनेत २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास वाजिद रऊप शेख हे वाहनाने भोकरदनकडून जोमाळ्याच्या दिशेने जात होते. याचवेळी रस्त्यावर लोंबकळत असलेली विद्युत तार त्यांच्या वाहनाच्या संपर्कात आली.
वीजतार वाहनाला लागल्याने वाहनामध्ये वीजप्रवाह उतरला आणि वाजिद शेख यांना जोरदार विजेचा धक्का बसला. हा प्रकार लक्षात येताच त्यांचे भाऊ जावेद मदतीसाठी धावून आले. मात्र वाजिद यांना हात लावण्याचा प्रयत्न करताच जावेद यांनाही विजेचा धक्का बसला.
या दुर्घटनेत वाजिद रऊप शेख यांचा मृत्यू झाला, तर जावेद शेख गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, या परिसरातील धोकादायक वीजतारांबाबत यापूर्वीही तक्रारी करण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे, सुमारे तीन महिन्यांपूर्वी याच परिसरात एका मुलालाही विजेचा धक्का बसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
वारंवार तक्रारी करूनही धोकादायक वीजतारांची दुरुस्ती करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे आता एका तरुणाचा जीव गेल्यानंतर तरी महावितरण प्रशासन जागे होणार का? असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
परिसरातील सर्व लोंबकळणाऱ्या आणि धोकादायक वीजतारांची तातडीने पाहणी करून त्यांची दुरुस्ती करावी, तसेच या दुर्घटनेची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी महावितरणने धोकादायक वीजवाहिन्यांची तातडीने पाहणी करणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.



