तस्करांच्या कारच्या टपावर ४० किलोमीटर पोलीस कर्मचाऱ्याचा थरारक प्रवास!

ताशी १०० किमी वेगाने कार पळवली; रूफ रेलिंग पकडून हेड कॉन्स्टेबलचा जीवघेणा पाठलाग
तमिळनाडू : चित्रपटांमध्ये पोलिसांना भरधाव कारचा पाठलाग करताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल… पण तमिळनाडूमध्ये असाच एक थरार प्रत्यक्ष रस्त्यावर घडला आहे. गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्या आरोपींची कार तब्बल ताशी १०० किलोमीटरच्या वेगाने धावत होती आणि या कारच्या टपावर एक पोलीस कर्मचारी तब्बल ४० किलोमीटर लटकून राहिला.
जीवाची पर्वा न करता कारच्या रूफ रेलिंगला घट्ट पकडून ठेवणाऱ्या ३८ वर्षीय हेड कॉन्स्टेबल एम. वेलमुरुगन यांच्या धाडसाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
नेमकं काय घडलं?
तमिळनाडूतील कोयंबतूरमध्ये पोलिसांची नियमित वाहन तपासणी सुरू असताना गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूच्या तस्करीची माहिती पोलिसांना मिळाली. बंगळुरूहून कोयंबतूरच्या दिशेने कर्नाटक पासिंगची एक पांढरी कार येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी महामार्गावर नाकाबंदी केली.
काही वेळातच संशयित कार पोलिसांच्या हद्दीत आली. पोलिसांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारमधील आरोपींनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांनी कारचे दरवाजे लॉक केले आणि भरधाव वेगाने कार पळवून नेली.
याचवेळी हेड कॉन्स्टेबल एम. वेलमुरुगन यांनी कार थांबवण्यासाठी धाव घेतली आणि थेट कारच्या बोनेटवरून टपावर उडी मारली. त्यानंतर त्यांनी कारच्या छतावरील रूफ रेलिंग दोन्ही हातांनी घट्ट पकडली.
आरोपींनी कारचा वेग ताशी १०० किलोमीटरच्या आसपास नेला. मात्र, वेलमुरुगन यांनी आपली पकड सोडली नाही. मागून पोलीस वाहनांचा ताफा सायरन वाजवत या कारचा पाठलाग करत होता. सुरक्षेच्या दृष्टीने ॲम्बुलन्सही रवाना करण्यात आली होती.
पोलिसांनी पुढील टोलनाक्याला माहिती देत बॅरियर बंद करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, कारमध्ये FASTag असल्याने बॅरियर आपोआप उघडला आणि तस्करांची कार पुढे निघून गेली.
यानंतर सुरू झाला तब्बल ४० किलोमीटरचा थरारक पाठलाग!
एक किलोमीटर… पाच किलोमीटर… दहा किलोमीटर… करत कार भरधाव वेगाने पुढे जात होती आणि हेड कॉन्स्टेबल वेलमुरुगन कारच्या टपावर रूफ रेलिंगला पकडून राहिले होते.
अखेर तिरुपूर जिल्ह्यातील अविनाशी परिसरातील थेकुलूर मंगलम भागात पोलिसांनी रस्ता अडवत कारला घेरलं.
कार थांबताच कारमधील तिन्ही आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून तिन्ही आरोपींना पकडण्यात यश मिळवलं.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी राजस्थानमधील असल्याचे समोर आले असून त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला आहे.
या संपूर्ण कारवाईत हेड कॉन्स्टेबल एम. वेलमुरुगन यांनी दाखवलेल्या धाडसाची चर्चा होत आहे. भरधाव वेगातील कारच्या टपावर तब्बल ४० किलोमीटर राहून आरोपींचा पाठलाग करण्याचा हा थरारक प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
तस्करांची कार… ताशी १०० किलोमीटरचा वेग… कारच्या टपावर पोलीस कर्मचारी… आणि तब्बल ४० किलोमीटरचा थरारक पाठलाग!
तमिळनाडूमधील या कारवाईने पोलिसांच्या धाडसाची पुन्हा एकदा झलक दाखवून दिली आहे.



