citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

एटीएममध्ये काळ्या पट्ट्या लावून ग्राहकांची फसवणूक; हुडकेश्वर पोलिसांकडून दोघांना अटक

41 ग्राहकांची ₹1.52 लाखांची फसवणूक उघड; काळ्या पट्ट्या, सेलो टेप, फेविक्विक, कात्रीसह साहित्य जप्त

नागपूर : एटीएममधून पैसे काढण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना हेरून त्यांच्या खात्यातील रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा हुडकेश्वर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एटीएमच्या कॅश डिस्पेंसरला काळ्या रंगाच्या पट्ट्या लावून पैसे अडकवायचे आणि ग्राहकांची नजर चुकवून ती रोकड काढून घ्यायची, अशा पद्धतीने फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणात 41 ग्राहकांची तब्बल 1 लाख 52 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले असून, पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.

हुडकेश्वर परिसरातील कॅनरा बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी येणारे ग्राहक आरोपींच्या निशाण्यावर होते. आरोपी एटीएमच्या कॅश डिस्पेंसरमध्ये काळ्या रंगाची पट्टी अशा पद्धतीने लावत होते की, ग्राहकाने व्यवहार केल्यानंतर पैसे बाहेर येत नसल्याचे दिसत होते.

पैसे निघाले नसल्याचे समजून ग्राहक एटीएममधून बाहेर पडल्यानंतर आरोपी संधी साधत कॅश डिस्पेंसरमध्ये अडकवलेली रोकड बाहेर काढून घेत असल्याचा आरोप आहे.

12 ते 15 सप्टेंबरदरम्यान तब्बल 41 ग्राहक अशा प्रकारे फसल्याचे तपासात समोर आले. या घटनांनंतर पोलिसांनी एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. संशयितांच्या हालचालींचा माग काढत पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली.

तपासादरम्यान 27 सप्टेंबर रोजी मानेवाडा रोड परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या सतीश गोरेलाल राजपूत याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतल्यानंतर पोलिसांना एटीएम फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा मोठा साठा आढळून आला. त्याच्याकडून काळ्या रंगाच्या पट्ट्या, सेलो टेप, फेविक्विक, कात्री, दोन एटीएम कार्ड आणि 7 हजार 500 रुपये रोख जप्त करण्यात आले.

यानंतर पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याने या गुन्ह्यातील साथीदार म्हणून धर्मेंद्र राजकपुर साहू याचे नाव सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या संशयितालाही ताब्यात घेतले आणि दोघांना या प्रकरणात अटक करण्यात आली.

या कारवाईमुळे एटीएमच्या कॅश डिस्पेंसरमध्ये छेडछाड करून ग्राहकांची फसवणूक करण्याची पद्धत समोर आली आहे. मात्र, या दोघांनी नागपूर शहरातील इतर एटीएममध्येही अशाच प्रकारे फसवणूक केली आहे का, तसेच या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

हुडकेश्वर पोलिसांच्या तपासामुळे 41 ग्राहकांची 1 लाख 52 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. आता आरोपींच्या चौकशीतून आणखी किती घटनांचा पर्दाफाश होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास हुडकेश्वर पोलीस करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button