AmravatiamravatinewscitynewsLatest NewsMaharashtra

अंसार नगरमध्ये अगरबत्तीच्या गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या १० ते १२ गाड्यांची शर्थीची झुंज

फारूक भाई पारले यांच्या सुमारे ५ हजार स्क्वेअर फुटांच्या गोदामाला रात्री आग; सुदैवाने जीवितहानी नाही

अमरावती : अमरावती शहरातील अंसार नगर बडी परिसरातून मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. फारूक भाई पारले यांच्या अगरबत्तीच्या गोदामाला रात्री अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

रात्री साधारण अकरा ते साडेअकराच्या सुमारास गोदामातून अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीची तीव्रता एवढी मोठी होती की गोदामातून मोठमोठे धुराचे लोट बाहेर पडत होते.

प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सुमारे ५ हजार स्क्वेअर फुटांच्या या अगरबत्तीच्या कारखान्यात १५ ते २० कर्मचारी काम करत असल्याची माहिती आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला तातडीने पाचारण करण्यात आले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अग्निशमन दलाच्या तब्बल १० ते १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी तातडीने पाण्याचा मारा सुरू करत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.

अगरबत्तीच्या गोदामातील मोठ्या प्रमाणातील साहित्यामुळे आग वेगाने पसरल्याचे दिसून आले. त्यामुळे अग्निशमन जवानांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र अथक प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.

दरम्यान, आगीची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. गर्दी वाढल्याने बचावकार्य आणि अग्निशमनाच्या कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे गाडगे नगर पोलीस, नागपुरी गेट पोलीस आणि क्राईम ब्रांचची पथके घटनास्थळी दाखल झाली.

गर्दी अनियंत्रित झाल्यानंतर पोलिसांना नागरिकांना घटनास्थळापासून दूर करण्यासाठी बळाचा वापर करावा लागला, अशी माहिती आहे.

अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केमिकल फोमऐवजी साध्या पाण्याचा वापर केला. काही तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले.

सुदैवाची बाब म्हणजे या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

मात्र आगीत गोदामातील मालाचे नेमके किती नुकसान झाले, याचा अधिकृत अंदाज अद्याप समोर आलेला नाही. गोदामाच्या आतील भागात अंधार असल्याने नुकसानीचे अचूक मूल्यांकन करता आले नसल्याची माहिती आहे. सकाळी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आर्थिक नुकसानीचा अंदाज स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुढील कार्यवाहीसाठी घटनास्थळी जेसीबीदेखील बोलावण्यात आला आहे. आगीचे नेमके कारण, गोदामातील मालाचे झालेले नुकसान आणि इतर बाबींची माहिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

सध्या आग पूर्णपणे विझवण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

अंसार नगर परिसरातील या भीषण आगीमुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

आगीचे नेमके कारण आणि आर्थिक नुकसानीचा अंतिम तपशील समोर आल्यानंतर या घटनेचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

अशाच महत्त्वाच्या आणि स्थानिक बातम्यांसाठी पाहत राहा… सिटी न्यूज!

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button