amravaticitynews

अमरावतीत बालहृदयरुग्णांसाठी मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

मेळघाटातील बालकांचीही होणार तपासणी; गरजेनुसार हृदय शस्त्रक्रियेसाठी मुंबईला पाठविणार

अमरावती : जिल्ह्यातील लहान मुलांच्या हृदयविकारावरील उपचारांसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने आणि आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून अमरावतीत बालकांसाठी मोफत 2D इको तपासणी तसेच हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगेश चिवटे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय शिबिराचे उद्घाटन आमदार सुलभाताई खोडके, आमदार बच्चू कडू, शिवसेना उपनेत्या प्रीतिताई बंड, शिवसेना नेते अरुण पडोळे, सोनाली देशमुख यांच्यासह शिवसैनिकांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या शिबिरात लहान मुलांची हृदयविकारासंदर्भातील प्राथमिक तपासणी तसेच 2D इको तपासणी मोफत करण्यात येत आहे. तपासणीनंतर ज्या बालकांना पुढील उपचार किंवा हृदय शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल, त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधेसाठी पुढे पाठविण्यात येणार आहे.

दरम्यान, शिबिरासाठी येणाऱ्या रुग्णांना ये-जा प्रवासासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याची घोषणा आमदार बच्चू कडू यांनी केली. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या कुटुंबांना या उपक्रमाचा लाभ घेणे सुलभ होणार आहे.

मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील बालकांसाठीही विशेष तपासणी करण्यात येणार आहे. उद्या या भागातील लहान मुलांची तपासणी करून, तपासणीदरम्यान हृदयविकाराची लक्षणे आढळल्यास किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता भासल्यास संबंधित बालकांना पुढील उपचारासाठी मुंबईला पाठविण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते अरुण पडोळे यांनी दिली.

अमरावती शहरासह ग्रामीण आणि मेळघाटातील गरजू बालकांना मोफत तपासणी, उपचाराचे मार्गदर्शन आणि आवश्यकतेनुसार हृदय शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या शिबिरातून करण्यात येत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेणे कठीण असलेल्या कुटुंबांसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button