अमरावतीत अवैध शस्त्र बाळगणारे दोघे अटकेत!

ग्राम राजुरा परिसरात पोलिसांची धडक कारवाई; पिस्टलसह दोन जण ताब्यात, ९२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती शहरात अवैध शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. ग्राम राजुरा परिसरात अवैध पिस्टल बाळगणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण ९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
पोलिसांना तपोवन गेट परिसरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की, फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम राजुरा परिसरात दोन इसम अवैध पिस्टल घेऊन फिरत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ग्राम राजुरा पाठी वाडा परिसरात जाऊन शोध घेतला.
यावेळी पोलिसांनी आरोपी अहैन मथरेश चव्हाण, वय २७ वर्षे, रा. ग्राम राजुरा पाठी वाडा, अमरावती याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे पिस्टल असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी त्याचा साथीदार नितीन पोपटकर उमटे, वय ४४ वर्षे, रा. व्यंकय्यापुरा, अमरावती याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात एक पिस्टल किंमत ९ हजार रुपये आणि दोन जिवंत काडतुसे किंमत २०० रुपये असा एकूण ९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल आहे.
या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध आर्म्स अॅक्टसह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध पिस्टल त्यांच्याकडे कसे आले, ते कोणाकडून मिळाले आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
अमरावती शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अवैध शस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबवली जात असून, या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.



