BreakingNewscitynewsLatest NewsNanded

नायब तहसीलदारांची कथित दादागिरी पुन्हा कॅमेऱ्यात कैद!

शेतीचा फेरफार थांबवण्यासाठी अर्ज देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला दमदाटी आणि मारण्याची धमकी दिल्याचा आरोप; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

नांदेडच्या लोहा तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कथित दादागिरीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. शेतीचा परस्पर झालेला फेरफार थांबवण्यासाठी अर्ज देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला नायब तहसीलदारांकडून दमदाटी आणि मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोहा तहसील कार्यालयातील कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

नांदेड जिल्ह्यातील लोहा तहसील कार्यालयातून अधिकाऱ्यांच्या कथित अरेरावीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.

लोहा तालुक्यातील खेडकरवाडी येथील चार आर शेतीचा परस्पर झालेला फेरफार थांबवण्यासाठी अर्ज देण्यासाठी एक शेतकरी तहसील कार्यालयात गेला होता.

गोविंद गिरजप्पा खिचडे या शेतकऱ्याने यासंदर्भात अर्ज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नायब तहसीलदार राजेश पाठक आणि अव्वल कारकून अजित केदार हे शेतकऱ्याशी अरेरावीच्या भाषेत बोलताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये शेतकऱ्याला दमदाटी करण्यात आल्याचे आणि मारण्याची धमकी दिल्याचेही आरोप आहेत.

त्यामुळे महसूल कार्यालयात सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांशी नेमकी कशी वागणूक दिली जाते, असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वीही लोहा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार राजेश पाठक यांचा एका शेतकऱ्याची कॉलर पकडून त्याला तहसील कार्यालयाबाहेर काढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

त्या घटनेनंतर आता पुन्हा एकदा अधिकाऱ्यांच्या कथित दादागिरीचा व्हिडिओ समोर आल्याने लोहा तहसील कार्यालयातील कारभार चर्चेत आला आहे.

दरम्यान, व्हायरल व्हिडिओतील आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. या प्रकरणात संबंधित महसूल अधिकाऱ्यांची बाजू आणि प्रशासनाकडून होणारी कारवाई काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या प्रशासकीय कामांसाठी असलेल्या तहसील कार्यालयातच जर दमदाटी आणि अरेरावीचे आरोप होत असतील, तर या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. व्हायरल व्हिडिओमुळे आता लोहा तहसील प्रशासनाकडून याबाबत काय स्पष्टीकरण दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button