मानोरा पंचायत समितीत ग्राम रोजगार सेवकाला चप्पलने मारहाण

मानोरा पंचायत समितीच्या आवारातील VIDEO व्हायरल; दोघांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
वाशिमच्या मानोरा पंचायत समितीत ग्राम रोजगार सेवकाला चप्पलने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरकुल योजनेचे मस्टर मुद्दाम टाकत नसल्याच्या रागातून ही मारहाण झाल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या प्रकरणी मानोरा पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशिमच्या मानोरा तालुक्यातील गादेगाव येथील ग्राम रोजगार सेवकाला पंचायत समितीच्या आवारात चप्पलने मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गादेगाव ग्रामपंचायतीमध्ये ग्राम रोजगार सेवक म्हणून कार्यरत असलेले अरविंद सोनोने हे ग्रामसभेच्या ठरावाचे अहवाल पंचायत समितीत जमा करण्यासाठी गेले होते.
याचवेळी सुदाम जाधव आणि त्यांची मुलगी पुष्पा चव्हाण यांनी अरविंद सोनोने यांच्याशी वाद घालत अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
घरकुल योजनेचे मस्टर मुद्दाम टाकत नसल्याच्या रागातून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
वाद वाढल्यानंतर रोजगार सेवकाला चप्पलने मारहाण करण्यात आल्याचा आरोप असून, या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्तीकडून रोजगार सेवकाला मारहाण होत असल्याचे दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या घटनेनंतर अरविंद सोनोने यांनी मानोरा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून सुदाम भिका जाधव आणि पुष्पा महादेव चव्हाण यांच्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, घरकुलाचे मस्टर न टाकल्याचा आरोप आणि त्यातून झालेल्या वादाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, याचा तपास आता मानोरा पोलीस करत आहेत.
शासकीय योजनेच्या कामकाजाशी संबंधित वादातून थेट सरकारी यंत्रणेतील कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याने या घटनेची परिसरात चर्चा रंगली आहे.
घरकुलाच्या मस्टरवरून सुरू झालेला वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचला आणि त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, मारहाणीमागील नेमकं कारण आणि आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. आता या प्रकरणात मानोरा पोलीस पुढे काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागलं आहे.



