AmravatiamravatinewscitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूला आरोग्यमंत्री आणि संबंधित अधिकारी जबाबदार?

दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; निकृष्ट व्हेंटिलेटर खरेदीचीही चौकशी करा – विजय वडेट्टीवार

अमरावती, दि. २६ : अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत तीन निष्पाप नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करत आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी आणि कालबाह्य फायर सेफ्टी ऑडिट यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. या प्रकरणी आरोग्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

फायर सेफ्टी ऑडिट कालबाह्य असतानाही कारवाई का नाही?

वडेट्टीवार यांच्या म्हणण्यानुसार, दुर्घटनेपूर्वीच अग्निशमन विभागाने रुग्णालय प्रशासनाला फायर सेफ्टी ऑडिटच्या नूतनीकरणाबाबत सूचना केल्या होत्या. मात्र त्यावर ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

आरोग्यमंत्री केवळ चौकशीची घोषणा करून आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत. या प्रकरणाचा चौकशी अहवाल आठ दिवसांच्या आत जाहीर करण्यात यावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचा आरोप

या दुर्घटनेनंतर आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांकडे जबाबदारी ढकलत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.

आरोग्यमंत्री आणि संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

२०२२ मधील घटनेचा अहवाल चार वर्षांनंतरही नाही?

वडेट्टीवार यांनी २०२२ मधील याच रुग्णालयातील व्हेंटिलेटरशी संबंधित घटनेचाही मुद्दा उपस्थित केला. त्या घटनेची चौकशी करण्यात आली होती, मात्र चार वर्षे उलटूनही चौकशीचा अहवाल समोर आला नाही आणि कारवाई झाली नाही, असा दावा त्यांनी केला.

त्याच पार्श्वभूमीवर सध्याच्या दुर्घटनेतील व्हेंटिलेटरच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित व्हेंटिलेटर हटवण्याची मागणी

२०२२ मधील घटनेतही शिल्लर कंपनीच्या व्हेंटिलेटरचा उल्लेख होता आणि सध्याच्या घटनेतही याच कंपनीच्या उपकरणांबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

राज्यातील विविध शासकीय रुग्णालयांमध्ये या कंपनीची उपकरणे वापरली जात असल्याचा दावा करत, त्यांच्या सुरक्षिततेची तपासणी करावी आणि आवश्यक असल्यास अशी व्हेंटिलेटर हटवून नवीन उपकरणे बसवावीत, अशी मागणी त्यांनी केली.

ही उपकरणे नेमकी कुठून खरेदी करण्यात आली? खरेदी प्रक्रियेत कोणाचा दबाव होता? उपकरणांच्या गुणवत्तेची तपासणी झाली होती का? असे सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केले.

मृत बालकांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत द्या

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तीन नवजात बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

तसेच दुर्घटनेच्या वेळी धाडस दाखवत सहा नवजात बालकांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या परिचारिकेच्या धाडसाची दखल शासनाने घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

अधिवेशनात सरकारला जाब विचारणार

अमरावतीतील या घटनेचा काँग्रेसकडून अधिवेशनात पाठपुरावा केला जाईल आणि सरकारला जाब विचारला जाईल, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

इतकी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरही आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने एकमेकांवर जबाबदारी ढकलून मोकळे होणे अत्यंत गंभीर असल्याची टीकाही त्यांनी केली.

यावेळी काँग्रेसचे माजी आमदार विरेंद्र जगताप, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी महापौर मिलिंद चिमोटे, अमरावती महापालिका विरोधी पक्षनेते विलास इंगोले, जिल्हाध्यक्ष बबलू उर्फ अनिरुद्ध देशमुख, महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखेडे, किशोर बोरकर, अनिकेत ढेंगले, वैभव वानखेडे, वैभव देशमुख यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

तीन नवजात बालकांच्या मृत्यूने अमरावती हादरली असताना आता फायर सेफ्टी, व्हेंटिलेटरची गुणवत्ता, खरेदी प्रक्रिया आणि रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारी निश्चित होते का आणि वडेट्टीवार यांच्या मागण्यांवर सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button