कामरगावच्या शाळेत स्वच्छतेचा अनोखा संदेश!

दहा दिवसीय सोशल मीडिया अभियानातून विद्यार्थ्यांचा स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा जागर; SWM वाशिमची मानवी साखळी ठरली आकर्षण
वाशिमच्या कामरगाव येथील पीएम श्री जिल्हा परिषद विद्यालयात स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देण्यात आला आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत राबविण्यात आलेल्या दहा दिवसीय सोशल मीडिया आयईसी अभियानाला विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वच्छ शाळा, सुंदर शाळेचा संदेश विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिला.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन आणि जिल्हा परिषद वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली हे दहा दिवसीय अभियान राबविण्यात आले.
घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, प्लास्टिकचा कमी वापर आणि सुरक्षित पर्यावरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. दररोजचा स्वच्छतेचा संदेश शाळेतील वर्गांच्या ग्रुपवर देण्यात आला आणि त्यानुसार विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम प्रत्यक्ष राबवले.
ओला आणि सुका कचरा स्वतंत्र करणे, कचऱ्याचे चार प्रकारात वर्गीकरण करणे, उघड्यावर कचरा न टाकणे, ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करणे आणि प्लास्टिकमुक्त गावाची शपथ घेणे, अशा विविध उपक्रमांचा अभियानात समावेश होता.
शालेय पोषण आहारातील उर्वरित ओला कचरा, भाज्यांचे देठ आणि झाडांची पाने यांचा वापर करून सेंद्रिय खत निर्मितीचे प्रयत्नही विद्यार्थ्यांनी केले.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी SWM वाशिम अशी मानवी साखळी तयार करून स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला. या अभियानामुळे शाळेच्या परिसरातील कचरा आणि प्लास्टिकचा वापर कमी झाल्याचे दिसून आले.
स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून ती दैनंदिन जीवनशैली आहे, हा संदेश कामरगावच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासनाच्या सहभागातून राबविण्यात आलेले हे अभियान स्वच्छ शाळा आणि सुरक्षित पर्यावरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.



