कोट्यवधींच्या रस्त्याला काही दिवसांतच भेगा!

सुकळी स्टेशन–मोर्चापूर रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; कंत्राटदारासह अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी
वर्ध्याच्या सेलू तालुक्यात कोट्यवधी रुपयांच्या रस्ते कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुकळी स्टेशन ते मोर्चापूर या सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण होऊन काही दिवसांतच रस्त्यावर भेगा पडल्याचा दावा करण्यात आला आहे. या भेगांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता या कामावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
सुकळी स्टेशन ते मोर्चापूर या सिमेंट रस्त्याच्या कामावरून वर्ध्यात राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
एकूण नऊ कामांची करारनामा किंमत सुमारे ४० कोटी रुपये असल्याची माहिती आहे. त्यापैकी सुकळी स्टेशन ते मोर्चापूर या रस्त्याचे काम सुमारे ३ कोटी रुपयांचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांतच रस्त्यावर भेगा पडल्याचा दावा करण्यात आला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कंत्राटदाराला कामाचे बिल अदा करण्यात आल्याचा दावा करत, कामाचा दर्जा निकृष्ट असेल तर बिल कसे अदा करण्यात आले, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते राणा रणनवरे यांनी कंत्राटदारासह संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. कनिष्ठ अभियंता, कार्यकारी अभियंता आणि कंत्राटदार यांच्यात कथित संगनमत झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या संपत्तीत झालेल्या वाढीची चौकशी करावी, अशी मागणी रणनवरे यांनी केली आहे. त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करावे आणि संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
चौकशी न झाल्यास उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा राणा रणनवरे यांनी दिला आहे.
दरम्यान, रस्त्याला भेगा पडल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या कामाच्या दर्जाबाबत पारदर्शक चौकशी होणार का, कामात दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार का, आणि कोट्यवधींच्या या कामाची जबाबदारी नेमकी कोणाची, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
राणा रणनवरे – राष्ट्रवादी नेते, वर्धा



