AmravatiBreakingNewscitynewsLatest News

अमरावतीत ऑटोचालकांचा सरकारविरोधात एल्गार

भाषेच्या सक्तीसह दहा हजारांच्या दंडावर आक्षेप; महिनाभरात दोन तास ऑटो बंद ठेवून जाहीर सभा घेण्याचा निर्णय

अमरावतीत ऑटोचालकांचा सरकारविरोधात एल्गार पाहायला मिळत आहे. केवळ ऑटोचालकांवर मराठी बोलण्याची सक्ती केल्याच्या निषेधासह विविध मागण्यांसाठी शहरातील ऑटोचालक आक्रमक झाले आहेत. या मागण्यांसाठी मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू करण्यात आली आहे.

विदर्भ ऑटोचालक फेडरेशनचे संस्थापक नितीन मोहोड यांच्या निवासस्थानी अमरावती शहरातील ऑटोचालक पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ऑटोचालकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मराठी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यासोबतच शहर ट्राफिक विभागाकडून आकारण्यात येणाऱ्या दहा हजार रुपयांच्या दंडाच्या मेमोवरही ऑटोचालकांनी आक्षेप घेतला. शहरातील ऑटो स्टॉपची संख्या वाढवावी, तसेच अनधिकृत बसेस आणि ट्रॅक्समुळे ऑटो स्टॉपवर होणारी गर्दी दूर करावी, अशी मागणी करण्यात आली.

येत्या महिनाभरात एका रविवारी शहरातील ऑटो दोन तास बंद ठेवून जाहीर सभा घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. या सभेसाठी पालकमंत्री, आमदार, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त आणि आरटीओ अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

दरम्यान, नितीन मोहोड यांच्या आवाहनाला ऑटोचालकांनी तत्काळ प्रतिसाद दिला. गंभीर आजारावर उपचार घेत असलेल्या ऑटोचालक अजय गणवीर यांच्या मदतीसाठी अवघ्या दहा मिनिटांत ऑटोचालकांनी तब्बल दहा हजार रुपयांची देणगी जमा केली.

भाषेच्या सक्तीसह दंड, ऑटो स्टॉप आणि अनधिकृत वाहतुकीच्या विविध प्रश्नांवर आता अमरावतीतील ऑटोचालक आक्रमक झाले आहेत. आगामी जाहीर सभेत प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button