amravatiAmravati PolicsBreakingNewscitynews

अमरावतीत उधारीचे पैसे मागणे पडले महागात; मित्रावरच लुटीचा आरोप

85 हजार रुपयांच्या उधारीवरून वाद; ॲक्टिवा, मोबाईल आणि रोकड असा 80 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल हिसकावल्याचा आरोप, नागपुरी गेट पोलिसांची काही तासांत कारवाई

अमरावतीत उधारीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या तरुणाला मित्रानेच लुटल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे! तब्बल 85 हजार रुपयांची उधारी मागण्यासाठी गेलेल्या तरुणासोबत शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत त्याची ॲक्टिवा, मोबाईल आणि रोकड जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. एकूण 80 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल घेऊन आरोपी पसार झाल्याची तक्रार नागपुरी गेट पोलिसांत दाखल करण्यात आली. मात्र पोलिसांनी अवघ्या काही तासांत तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून चोरीची ॲक्टिवाही जप्त केली आहे. नेमकं काय घडलं, पाहूया या विशेष रिपोर्टमधून.

अमरावती शहरातील रोशन नगर परिसरात राहणारे 32 वर्षीय शेख सलमान शेख सलीम यांनी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी स्वतःची ॲक्टिवा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

तक्रारीनुसार, त्यांचा मित्र मोहम्मद वसीम अब्दुल राऊफ उर्फ वसीम राफ्टर याने सुमारे तीन वर्षांपूर्वी त्यांच्याकडून 85 हजार रुपये उधार घेतले होते. 20 ऑगस्ट रोजी शेख सलमान यांनी उधारीचे पैसे परत मागितले. त्यानंतर त्यांना सायंकाळी बिसमिल्ला नगर चौकात बोलावण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

शेख सलमान हे आपली ॲक्टिवा क्रमांक एमएच 27 ईबी 0583 घेऊन बिसमिल्ला नगर चौकात पोहोचले. त्याठिकाणी वसीम राफ्टरसह त्याचे दोन साथीदार उपस्थित असल्याचा आरोप आहे.

उधारीच्या पैशांवरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत आरोपींनी साथीदारांच्या मदतीने शेख सलमान यांची ॲक्टिवा, ओपो कंपनीचा मोबाईल फोन आणि रोकड असा एकूण 80 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या घटनेनंतर नागपुरी गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

अवघ्या काही तासांत पोलिसांनी मोहम्मद वसीम अब्दुल राऊफ उर्फ वसीम राफ्टर आणि अहमद बेग रशिद बेग या दोघांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान जबरदस्तीने हिसकावून नेलेली ॲक्टिवा पोलिसांनी जप्त केली असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके आणि सहायक पोलीस आयुक्त निलेश ब्राम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपुरी गेट पोलिसांनी ही कारवाई केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके, पोलीस निरीक्षक निशांत देशमुख आणि डीबी पथकाने कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

या प्रकरणाचा पुढील तपास नागपुरी गेट पोलीस करत आहेत.

85 हजारांची उधारी, पैशांवरून वाद आणि त्यानंतर ॲक्टिवा, मोबाईलसह रोकड जबरदस्तीने हिसकावल्याचा आरोप! मात्र घटना घडल्यानंतर आरोपी पसार झाले असले तरी नागपुरी गेट पोलिसांनी अवघ्या काही तासांत तपास करून दोन आरोपींना ताब्यात घेतले आणि ॲक्टिवाही जप्त केली. या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलीस करत आहेत.

अमरावतीतून सिटी न्यूजसाठी विशेष रिपोर्ट.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button