रामटेकमध्ये कार-ऑटोची जोरदार धडक; तीन महिला जखमी

लंबे हनुमान मंदिराजवळील वळणावर अपघात; जखमींवर योगीराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
रामटेक | प्रतिनिधी अजय मेहरकुळे
रामटेकमधून अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. लंबे हनुमान मंदिराजवळ कार आणि ऑटोची जोरदार धडक होऊन ऑटोमधील तीन महिला प्रवासी जखमी झाल्या. हा अपघात ११ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडला.
वळणावर कारची ऑटोला धडक
मिळालेल्या माहितीनुसार, कार क्रमांक MH 47 Q 1662 रामटेक बायपास मार्गे तुमसरच्या दिशेने जात होती. लंबे हनुमान मंदिर परिसरातील वळणावर समोरून रामटेकच्या दिशेने येणाऱ्या MH 31 DS 0941 क्रमांकाच्या ऑटोला कारची जोरदार धडक बसली.
हा ऑटो अंबाळा येथील प्रवाशांना रामटेक बसस्थानकात सोडण्यासाठी जात असल्याची माहिती आहे. धडकेनंतर ऑटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यातील तीन महिला जखमी झाल्या.
जखमींना रुग्णालयात दाखल
अपघाताची माहिती मिळताच जखमी महिलांना तातडीने योगीराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती संबंधित यंत्रणेला देण्यात आली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.
अवजड वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
दरम्यान, लंबे हनुमान मंदिर परिसरात रस्त्याच्या कडेला मोठी आणि अवजड वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.
रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे वाहने उभी राहिल्याने वाहनचालकांना वळणावरून मार्ग काढताना अडचणी येतात. त्यामुळे अशा ठिकाणी अपघाताचा धोका वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कारवाईची नागरिकांची मागणी
या परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
कार आणि ऑटोच्या अपघातानंतर लंबे हनुमान मंदिर परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अवजड वाहनांमुळे होणारा अडथळा दूर करण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सिटी न्यूजसाठी अजय मेहरकुळे, रामटेक.



