citynewsLatest NewsMaharashtraWashim

मानोरा तालुक्यात वीज भारनियमनाविरोधात झोपा आंदोलन

रात्री चार तास वीज खंडित; महावितरण कार्यालयात ग्रामस्थांचा ठिय्या, नियमित वीजपुरवठ्याची मागणी

मानोरा (वाशिम) | प्रतिनिधी

वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात सुरू असलेल्या वीज भारनियमनाविरोधात नागरिकांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला आहे. अनेक गावांमध्ये दररोज रात्री चार तास वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मानोरा येथील महावितरण उपविभागीय कार्यालयात झोपा आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी नियमित वीजपुरवठा तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

कारखेडा, वरोली, रामतिर्थ, सेवादासनगर, तळप बुद्रुक, विठोली आदी गावांमध्ये दररोज रात्री सात ते अकरा या वेळेत वीजपुरवठा खंडित राहत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. सततच्या भारनियमनामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून उकाड्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि विविध आजारांनी त्रस्त रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

यापूर्वीही ग्रामस्थांनी महावितरणकडे वारंवार निवेदने देऊन वीजपुरवठा नियमित करण्याची मागणी केली होती. मात्र परिस्थितीत कोणतीही सुधारणा न झाल्याने संतप्त नागरिकांनी महावितरण उपविभागीय कार्यालयाच्या प्रांगणात ठिय्या देत झोपा आंदोलन छेडले.

आंदोलनादरम्यान शेकडो ग्रामस्थांनी महावितरणविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि तातडीने अखंड वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तयारीवर भारनियमनाचा विपरीत परिणाम होत असल्याने हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे आता महावितरण प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button