citynewsLatest NewsMaharashtraWardha

‘मला तुमचा भाऊ समजा’; वर्धा पोलिसांचा मुलींच्या सुरक्षिततेसाठी संवेदनशील पुढाकार

ठाणेदार प्रल्हाद मदन यांचे आवाहन; छेडछाड करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा

वर्धा | प्रतिनिधी

महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी वर्धा शहर पोलिसांनी एक संवेदनशील आणि विश्वासार्ह पुढाकार घेतला आहे. “कोणी वाईट नजरेने पाहिलं, त्रास दिला किंवा छेडछाड केली तर मला तुमचा भाऊ समजून निःसंकोच सांगा,” असा भावनिक संदेश ठाणेदार प्रल्हाद मदन यांनी मुलींना दिला आहे. त्यांच्या या भूमिकेचे नागरिकांकडून आणि विविध स्तरांतून स्वागत होत आहे.

महिला सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन आयोजित जनजागृती कार्यक्रमात ठाणेदार प्रल्हाद मदन यांनी मुलींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोणत्याही प्रकारची छेडछाड, त्रास किंवा महिलांविरुद्ध होणाऱ्या गैरप्रकारांची माहिती तातडीने पोलिसांना देण्याचे आवाहन केले.

“कोणत्याही मुलीने भीती बाळगू नये. कोणी त्रास देत असेल तर मला तुमचा भाऊ समजून थेट सांगा. तुमच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची आहे,” असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांबाबत पोलीस प्रशासनाची शून्य सहनशीलतेची भूमिका स्पष्ट करण्यात आली. छेडछाड, महिलांचा छळ किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींविरुद्ध तातडीने आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला.

या उपक्रमामुळे मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होण्यास मदत होईल, तसेच पोलीस आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महिलांनी आणि मुलींनी कोणत्याही प्रकारचा त्रास सहन न करता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button