कर्जमाफीवरून बच्चू कडू आक्रमक; मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते Bacchu Kadu यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या अधिवेशनात कर्जमाफीचा मुद्दा निकाली निघाला नाही, तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पुन्हा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
बच्चू कडू म्हणाले की, सुरुवातीला कर्जमाफी देण्यास नकार देणाऱ्या सरकारला अखेर कर्जमाफीची तारीख जाहीर करावी लागली. हे यश शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या संघर्षामुळे मिळाले आहे. मात्र सध्या जाहीर करण्यात आलेली दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी अपुरी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ज्या शेतकऱ्यांकडे अडीच लाख, तीन लाख किंवा त्यापेक्षा अधिक कर्ज आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे सरकारने महात्मा फुले कर्जमाफी योजनेप्रमाणे व्यापक आणि सर्वसमावेशक कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन निधीबाबतही त्यांनी सरकारकडे मागणी केली. सध्या दोन वर्षे सलग कर्जफेड करणाऱ्यांनाच प्रोत्साहन निधी दिला जातो. मात्र हा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळावा आणि ५० हजार रुपयांऐवजी किमान एक लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहन निधी द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
शेतमालाला हमीभाव मिळत नाही, तोपर्यंत सरकारने प्रोत्साहन निधीची योजना सुरू ठेवावी, असेही बच्चू कडू यांनी सांगितले. याशिवाय मागील कर्जमाफी योजनेतील अनेक शेतकरी अजूनही लाभापासून वंचित असल्याचा दावा त्यांनी केला. अनेकांना कर्जमाफीचा तसेच प्रोत्साहन निधीचा लाभ अद्याप मिळालेला नसल्याने सरकारने त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
“आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. अधिवेशनात या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर लवकरच पुढील आंदोलनाची तारीख जाहीर करू,” असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
राज्यात कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आगामी अधिवेशनात सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकरी संघटना आणि आंदोलनकर्त्यांमध्येही या प्रश्नावर मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.


