मालवीय नगर हॉटेल अग्नितांडव प्रकरण; 21 जणांच्या मृत्यूनंतर हॉटेल मालकाला 4 दिवसांची पोलीस कोठडी

नवी दिल्ली : दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या प्रकरणातील आरोपी हॉटेल मालक लवकेश बजाज याला दिल्लीतील न्यायालयाने चार दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे.
गुरुवारी न्यायिक दंडाधिकारी भानू प्रताप सिंह यांच्या न्यायालयात आरोपीला हजर करण्यात आले. यावेळी दिल्ली पोलिसांनी आरोपीची सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने पोलिसांची बाजू मान्य करत लवकेश बजाज याला चार दिवसांच्या पोलीस कोठडीची मंजुरी दिली.
मालवीय नगरमधील हॉटेलमध्ये काही दिवसांपूर्वी भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत 21 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. आगीमुळे हॉटेलमध्ये अडकलेल्या अनेकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून हॉटेलमधील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
तपासादरम्यान हॉटेलमध्ये अग्निसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत बचावासाठी आवश्यक असलेल्या सुविधांमध्ये त्रुटी असल्याचाही संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती.
दिल्ली पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 105, 326(ग), 324(5), 125(अ), 125(ब) आणि 287 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या कलमांमध्ये निष्काळजीपणा, जीवितहानी आणि सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन यासारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे.
पोलिसांच्या मते, आरोपीची कोठडीत चौकशी करून हॉटेलच्या परवानग्या, सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी, कर्मचाऱ्यांची जबाबदारी आणि आगीमागील नेमके कारण याबाबत अधिक माहिती मिळवली जाणार आहे. तसेच या प्रकरणात इतर कोणाची जबाबदारी आहे का, याचाही तपास केला जाणार आहे.
दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आगामी काही दिवसांत आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



