‘क्षणात होत्याचं नव्हतं! जालन्यात भीषण अपघातानंतर कारने घेतला पेट; एसटी चालकाचा दुर्दैवी मृत्यू’

जालना : जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद परिसरात झालेल्या भीषण अपघातात कार झाडावर आदळून पेट घेतल्याने एसटी महामंडळाच्या चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. काही क्षणांपूर्वी सहकाऱ्यांसोबत चहा घेत हसत-खेळत प्रवास करणाऱ्या व्यक्तीचा असा अचानक अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळात चालक म्हणून कार्यरत असलेले नितीन प्रभाकर गवळी हे नाशिकहून अकोल्याकडे कारने प्रवास करत होते. त्यांच्या सोबत दुसऱ्या वाहनात दोन सहकारीही प्रवास करत होते. प्रवासादरम्यान सर्वजण महामार्गावर एका ठिकाणी थांबले आणि चहा घेऊन पुन्हा आपल्या मार्गाला निघाले. मात्र काही वेळातच हा प्रवास भीषण दुर्घटनेत बदलला.
जाफ्राबाद परिसरात पोहोचताच नितीन गवळी यांच्या कारवरील नियंत्रण अचानक सुटल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार धडकली आणि काही क्षणांतच वाहनाने पेट घेतला. आगीचा वेग इतका प्रचंड होता की कारमध्ये एकटे असलेल्या नितीन गवळी यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, पुढे गेलेले सहकारी बराच वेळ नितीन गवळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मोबाईल बंद लागत असल्याने त्यांना संशय आला आणि ते परत मागे फिरले. घटनास्थळी पोहोचताच त्यांना रस्त्याच्या कडेला जळून खाक झालेली कार दिसली. काही वेळापूर्वी एकत्र चहा घेतलेल्या सहकाऱ्याचा असा दुर्दैवी अंत पाहून त्यांना मोठा मानसिक धक्का बसला.
घटनेची माहिती मिळताच जाफ्राबाद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. परिसरातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केली होती.
या घटनेमागे नेमके कारण काय होते, वाहनात तांत्रिक बिघाड झाला होता का किंवा चालकाचे नियंत्रण का सुटले, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. प्राथमिक तपासात हा अपघात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असला तरी संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या भीषण अपघातामुळे जाफ्राबाद परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, काही क्षणांपूर्वी सहकाऱ्यांसोबत असलेला व्यक्ती असा अचानक निघून गेल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.



