नागपूरमध्ये वृद्ध महिलेच्या हत्येचा काही तासांत उलगडा; चुलत नातवानेच केला खून

नागपूरच्या लष्करी बाग परिसरात आज सकाळी उघडकीस आलेल्या वृद्ध महिलेच्या निर्घृण हत्याकांडाचा पाचपावली पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हा खून दुसऱ्या कुणी नसून मृत महिलेच्या चुलत नातवानेच केल्याचे तपासात समोर आले आहे. चोरी उघडकीस येण्याच्या भीतीतून आणि दारूच्या नशेत आरोपीने वृद्धेवर चाकूचे सपासप वार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आज सकाळी नागपूरच्या लष्करी बाग परिसरात इंदु चव्हाण या वृद्ध महिलेचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह घरात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी, डीबी पथक आणि अन्य पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. भौतिक पुरावे, तांत्रिक माहिती आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने संशयिताचा शोध सुरू करण्यात आला. तपासादरम्यान आरोपी नागपूरमधून पसार झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पाचपावली पोलिसांच्या डीबी पथकाने कळमेश्वरजवळील एका गावात छापा टाकून आरोपीला अटक केली.
प्राथमिक चौकशीत आरोपी हा मृत इंदु चव्हाण यांचा चुलत नातू असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी वारंवार आजीच्या नकळत पैसे आणि इतर वस्तू चोरून वापरत होता. ही बाब वृद्धेला समजल्याने चोरी उघडकीस येण्याची भीती आरोपीला वाटत होती.
याच संतापातून आणि दारूच्या नशेत आरोपीने स्वतःजवळील चाकूने इंदु चव्हाण यांच्यावर चार ते पाच गंभीर वार केले. या भीषण हल्ल्यात वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला.
तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांत आरोपीला अटक करण्यात पाचपावली पोलिसांना यश आले आहे. या धडक कारवाईबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पथकाचे कौतुक केले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
नागपूरमधील या धक्कादायक हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी जलद गतीने तपास करत आरोपीला अटक केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.



