‘आम्ही भाई आहोत’ म्हणत बारमध्ये धिंगाणा; बिअरच्या बाटल्यांनी तरुणावर जीवघेणा हल्ला, चार आरोपी अटकेत

पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरात बारमध्ये भाईगिरी करत एका तरुणावर बिअरच्या बाटल्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कदमवाकवस्ती येथील सागर रेस्टॉरंट अँड बारमध्ये झालेल्या या हल्ल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह चार आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात कदमवाकवस्ती परिसरातील सागर रेस्टॉरंट अँड बारमध्ये काही तरुणांनी दहशत निर्माण करत गोंधळ घातला. “आम्ही भाई आहोत” असे म्हणत त्यांनी बारमध्ये धिंगाणा घालत एका तरुणाला जिवे मारण्याची धमकी दिली.
वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी संतापाच्या भरात संबंधित तरुणाच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्या. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत अखेर एका विधीसंघर्ष बालकासह चार जणांना मोठ्या शिताफीने अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण आणि आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची चौकशी केली जात आहे.
लोणी काळभोर परिसरातील या घटनेमुळे बार आणि सार्वजनिक ठिकाणी वाढत्या गुंडगिरीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे आरोपी गजाआड गेले असले तरी अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



