नागपूर जिल्ह्यातील वाकी दरबार परिसरात अनोळखी व्यक्तीचा मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू

नागपूर जिल्ह्यातील वाकी दरबार परिसरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. गंभीर अवस्थेत आढळलेल्या एका अनोळखी व्यक्तीला सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून खापा पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाकी दरबार येथील अध्यक्ष प्रभाकर डहाके यांनी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना फोन करून एका व्यक्तीची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती दिली. संबंधित व्यक्तीला कोणीतरी वाकी दरबार परिसरात आणून सोडून गेल्याचेही त्यांनी सांगितले.
माहिती मिळताच हितेश बनसोड यांनी तात्काळ खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर सामाजिक बांधिलकी जपत संबंधित व्यक्तीला स्वतःच्या ॲम्बुलन्सच्या मदतीने पाटणसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या व्यक्तीवर प्राथमिक उपचार केले. मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात आले. दुर्दैवाने उपचार सुरू असतानाच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
दरम्यान, मृत व्यक्तीजवळ मिळालेल्या आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या आधारे खापा पोलिसांनी त्यांची ओळख पटवली आहे. प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव युसूफ इब्राहिम अरेलीवाला, वय 69 वर्षे असून ते नागपाडा, मुंबई येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
मात्र ही व्यक्ती नागपूर जिल्ह्यातील वाकी दरबार परिसरात कशी पोहोचली, त्यांना कोण आणून सोडून गेले आणि त्यांच्या प्रकृतीची अशी अवस्था कशी झाली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिस विविध अंगांनी तपास करत असून परिसरातील माहिती, संपर्क आणि इतर बाबींची पडताळणी सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात अनेक प्रश्न उपस्थित होत असून खापा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पुढील तपासातून या घटनेमागील संपूर्ण सत्य समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



