India NewsLatest NewsWeather Report

उकाड्यानंतर दिलासा! महाराष्ट्रासह देशभरात पावसाची हजेरी; मान्सूनच्या आगमनाची चाहूल

देशभरात गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाड्याने नागरिक हैराण झाले असताना आता हवामान खात्याकडून दिलासादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीसह उत्तर भारतात तापमानाने विक्रमी पातळी गाठली असून उत्तर प्रदेशातील बांदा येथे तब्बल ४८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राजधानी दिल्लीमध्येही पारा ४५ अंशांच्या पुढे गेल्याने नागरिकांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवसांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

पश्चिम बंगालमध्ये २१ ते २३ मे दरम्यान मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बिहारमध्ये २० ते २६ मेदरम्यान विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे, तर झारखंडमध्येही २१ ते २६ मे या कालावधीत हवामान बदलणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ओडिशामध्ये २२ ते २४ मेदरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वायव्य भारतातही हवामानात बदलाची चिन्हे दिसत असून जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या डोंगराळ भागांमध्ये २१ ते २३ मेदरम्यान मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. या भागांमध्ये ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

दक्षिण भारतातही पावसाची सक्रियता वाढणार असून तामिळनाडू, पुदुचेरी, केरळ, माहे आणि कराईकलमध्ये २१ ते २४ मेदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तेलंगणामध्येही विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.

महाराष्ट्रातही मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागली असून येत्या ५ ते ६ जूनदरम्यान मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ कायम आहे.

दरम्यान, मुंबईतील तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. उष्णतेच्या लाटेनंतर आता पावसाच्या आगमनामुळे वातावरणात गारवा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button