ई-फार्मसीविरोधात आज देशव्यापी ‘भारत बंद’; अमरावतीतील केमिस्ट संघटनांचाही सक्रिय सहभाग

अमरावतीसह संपूर्ण देशातील केमिस्ट आणि औषध विक्रेत्यांनी आज मोठा आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्सच्या आवाहनावरून बुधवार, २० मे २०२६ रोजी देशव्यापी ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. ऑनलाईन औषध विक्री अर्थात ई-फार्मसी बंद करणे, बनावट औषधांवर नियंत्रण आणणे आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अव्यवसायिक सवलतींना विरोध करणे, हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, देशात झपाट्याने वाढणारी ई-फार्मसी व्यवस्था ही पारंपरिक औषध विक्रेत्यांसाठी मोठा धोका ठरत आहे. ऑनलाईन औषध विक्रीमुळे स्थानिक मेडिकल दुकानदारांचे अस्तित्व धोक्यात आले असून मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या आकर्षक सवलतींमुळे छोट्या व्यवसायांवर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
याशिवाय, ऑनलाईन औषध विक्रीमुळे बनावट औषधांचा धोका वाढत असून रुग्णांच्या आरोग्य सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे. सध्याच्या औषध आणि सौंदर्यप्रसाधने कायद्यानुसार ई-फार्मसीला स्पष्ट परवानगी नसतानाही देशभरात मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन औषध विक्री सुरू असल्याचा मुद्दाही संघटनेने उपस्थित केला आहे.
अमरावती जिल्ह्यातील डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननेही या बंदला पूर्ण पाठिंबा दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष सौरभ मालाणी आणि सचिव राजा नानवानी यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन देत आंदोलनाची माहिती दिली.
संघटनेने स्पष्ट केले आहे की, या आंदोलनाचा उद्देश जनतेला वेठीस धरणे नसून स्थानिक औषध विक्रेत्यांचे अस्तित्व वाचवणे आणि आरोग्य व्यवस्थेचे संरक्षण करणे हा आहे.
दरम्यान, बंदमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. अत्यावश्यक औषधांचा पुरवठा सुरू ठेवण्यात येणार असून अमरावतीतील रायली प्लॉट येथील महावीर प्लाझा – दवा बाजारमधील काही केमिस्ट सेवा उपलब्ध ठेवणार आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी २६ हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित ठेवण्यात आले आहेत.
संघटनेने इशारा दिला आहे की, सरकारने ई-फार्मसीवर कठोर नियम लागू करून आवश्यक निर्णय घेतला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. “अभी नहीं तो कभी नहीं” या घोषणेसह देशव्यापी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.



