अमरावतीत समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन; दोन महिन्यांचे वेतन, नऊ महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता रखडल्याने संताप

अमरावती : आपल्या न्याय्य मागण्यांसाठी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी (Community Health Officers – CHO) थेट अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. जिल्हा परिषद मुख्यालयासमोर शेकडो समुदाय आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी एकत्र येत जोरदार आंदोलन करत असून, थकीत वेतन आणि प्रोत्साहन भत्ता तातडीने देण्याची मागणी केली जात आहे.
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही, तर तब्बल नऊ महिन्यांपासून प्रोत्साहन भत्ता रखडला आहे. त्यामुळे अनेक आरोग्य अधिकाऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट ओढावले असून, घरखर्च, मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते आणि दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले आहे.
“कोरोना काळापासून ग्रामीण भागात अहोरात्र सेवा देत आहोत. मात्र, वेळेवर वेतन आणि भत्ते न मिळाल्याने आमच्यावर अन्याय होत आहे,” अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
या अन्नत्याग आंदोलनाचा परिणाम ग्रामीण आरोग्य सेवांवर दिसून येत आहे. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांतील कामकाज विस्कळीत झाले असून, रुग्णांना उपचारासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळण्यात अडथळे निर्माण झाले आहेत.
आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जोपर्यंत दोन महिन्यांचे थकीत वेतन आणि नऊ महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता जमा होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही.
या आंदोलनामुळे जिल्हा परिषद प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला असून, आरोग्य विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनाच त्यांच्या हक्कासाठी उपोषणाला बसावे लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता प्रशासन यावर कितपत लवकर निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



