AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत पाणीपुरवठ्यावर संकटाची शक्यता; 18.81 कोटींच्या थकीत देयकांसाठी कंत्राटदारांचे आंदोलन तीव्र

अमरावती शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेवर पुन्हा एकदा संकटाची चिन्हे दिसू लागली आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटदारांनी थकीत देयकांच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र केले असून, वेळेत पैसे न मिळाल्यास पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे.

कंत्राटदारांच्या म्हणण्यानुसार, सन 2024-25 या आर्थिक वर्षातील सुमारे 3 कोटी 50 लाख रुपये आणि 2025-26 मधील 15 कोटी 31 लाख रुपये अशी एकूण 18 कोटी 81 लाख रुपयांची देयके अद्याप प्रलंबित आहेत. या रकमेअभावी कामगारांचे वेतन, साहित्य खरेदी आणि पाणीपुरवठा यंत्रणेची नियमित देखभाल करणे कठीण होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या मागणीसाठी कंत्राटदारांनी 6 मेपासून मजीप्रा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या सातव्या दिवशी आंदोलकांनी “पाने जमा” आंदोलन करत प्रशासनाविरोधात निषेध व्यक्त केला.

कंत्राटदारांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, थकीत देयके तातडीने न दिल्यास शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो. त्यामुळे अमरावतीकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले आहे. उपअभियंता संजय लेवकर यांनी शहराचा पाणीपुरवठा बंद होणार नसल्याचा दावा केला असला, तरी कंत्राटदार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे.

उन्हाळ्याच्या तीव्र पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता नागरिकांसाठी गंभीर ठरू शकते. त्यामुळे प्रशासन आणि कंत्राटदार यांच्यातील हा वाद लवकरात लवकर मिटणे आवश्यक मानले जात आहे.

आता या चर्चेतून तोडगा निघतो का, आणि अमरावतीकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button