‘स्त्री : संघर्ष ते स्वराज्य 2026’ वार्षिकांकाचे उत्साहात स्वागत; खासदार-आमदारांच्या उपस्थितीत स्त्री शक्ती मंचाच्या उपक्रमाचे कौतुक

अमरावती | प्रतिनिधी
महिलांच्या साहित्यिक, सामाजिक आणि वैचारिक योगदानाला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘स्त्री : संघर्ष ते स्वराज्य 2026’ या वार्षिकांकाचे अमरावतीत उत्साहात स्वागत करण्यात आले. खासदार बळवंत वानखेडे, आमदार गजानन लवटे आणि तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील दाळू यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
छत्रपती संभाजीनगर येथून सुरू झालेला हा साहित्यिक उपक्रम आज संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तारला असून, विविध क्षेत्रातील महिलांना एकत्र आणणारा प्रेरणादायी आणि समृद्ध परिवार म्हणून या उपक्रमाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
स्त्री शक्ती मंचाचा सलग चौथा अंक
‘स्त्री शक्ती मंच’च्या माध्यमातून प्रकाशित होणारा हा सलग चौथा वार्षिकांक आहे. मुख्य संपादक चंद्रकांत तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील विविध जिल्ह्यांतील कार्यकारी संपादकांनी या अंकासाठी मोलाचं योगदान दिलं आहे.
अमरावती जिल्ह्याच्या वतीने समीक्षा वाकोडे यांनी कार्यकारी संपादक म्हणून सक्रिय सहभाग नोंदवत साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलं आहे.
शंभरहून अधिक साहित्यिकांचे लेखन
या विशेष अंकात महाराष्ट्रातील शंभरहून अधिक साहित्यिकांचे लेख, कविता आणि वैचारिक लिखाण प्रकाशित करण्यात आले आहे. सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, प्रशासकीय आणि राजकीय अशा विविध विषयांना स्पर्श करत या अंकाने आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे.
महिलांना मिळतंय हक्काचं व्यासपीठ
मागील चार वर्षांपासून कर्तबगार महिलांना साहित्य आणि विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम स्त्री शक्ती मंच सातत्याने करत आहे. यंदाचा अंक महिलांना नवं आत्मभान, प्रेरणा आणि आत्मविश्वास देणारा ठरत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
मान्यवरांकडून उपक्रमाचे कौतुक
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी स्त्री शक्ती मंचाच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि साहित्यिक चळवळीला चालना देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
‘स्त्री : संघर्ष ते स्वराज्य 2026’ हा वार्षिकांक केवळ साहित्यिक उपक्रम नसून, महिलांच्या संघर्ष, कर्तृत्व आणि स्वाभिमानाचा प्रवास मांडणारा प्रेरणादायी दस्तावेज ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



