तीन वर्षांनंतरही चिमुकलीला न्याय नाही! जळगाव हादरवणाऱ्या निर्घृण हत्याकांडाचा संताप आजही कायम

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात २०२३ साली घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अवघ्या सात वर्षीय निष्पाप बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी स्वप्निल पाटील याने बालिकेवर अत्याचार केल्यानंतर तिचा चेहरा दगडाने ठेचून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. इतकंच नव्हे, तर मृतदेह मक्याच्या कुट्टीमध्ये लपवून ठेवण्यात आला होता.
घटनेनंतर तब्बल दोन दिवसांनी परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आणि संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या अमानुष घटनेमुळे पाचोरा-भडगावसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत विविध ठिकाणी आंदोलनं केली होती.
मात्र, या घटनेला आता तीन वर्षांचा कालावधी उलटूनही पीडित चिमुकलीला अद्याप न्याय मिळालेला नाही. न्यायालयीन प्रक्रियेला होत असलेला विलंब आणि प्रकरणाच्या सुनावणीतील संथ गती यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पीडित कुटुंबीय आजही न्यायाच्या प्रतीक्षेत असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.
“चिमुकलीसाठी न्याय कधी?” असा सवाल आता जनतेकडून उपस्थित केला जात असून, या प्रकरणात जलदगतीने सुनावणी करून कठोर निर्णय घ्यावा, अशी मागणी सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून केली जात आहे.



