अंधारात उभा टँकर ठरला मृत्यूचा सापळा; सावनेर तालुक्यात दुचाकीची भीषण धडक, पती-पत्नीचा जागीच मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात एक हृदयद्रावक अपघात घडला असून,
रस्त्याच्या कडेला अंधारात निष्काळजीपणे उभ्या असलेल्या ट्रॅक्टर-टँकरमुळे
पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या घटनेमुळे महारकुंड परिसरात शोककळा पसरली आहे.
ही दुर्घटना सावनेर तालुक्यातील महारकुंड येथे खापा–महारकुंड मार्गावर रात्री साडेसातच्या सुमारास घडली.
श्रावण झिंगू परतेकी आणि कांता श्रावण परतेकी अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण आणि कांता परतेकी हे दोघेही सावनेर येथे कथा आटपून आपल्या गावी दुचाकीने परतत होते.
यावेळी खापा–महारकुंड मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रॅक्टर-टँकरला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली.
या अपघातातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, रस्त्यावर उभ्या असलेल्या टँकरवर
ना कोणताही मागील दिवा होता, ना रेडियम पट्टी, ना इशाऱ्यासाठी कोणतेही चिन्ह.
पूर्ण अंधारात हा टँकर अक्षरशः मृत्यूचा सापळाच ठरला.
धडक इतकी भीषण होती की पती-पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच खापा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली
आणि दोघांनाही सावनेर येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून,
या अपघाताप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
प्राथमिक तपासात निष्काळजीपणे रस्त्यावर वाहन उभे केल्यामुळेच हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या दुर्घटनेमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
रस्त्यावर कोणतेही वाहन उभे करताना सुरक्षा नियमांचे पालन करणे किती आवश्यक आहे,
याची जाणीव या घटनेने पुन्हा करून दिली आहे.
एका छोट्याशा निष्काळजीपणाने दोन जीव गेले…
आणि दोन कुटुंबांचा आधार कायमचा हिरावला गेला.
महारकुंड येथील ही दुर्घटना केवळ अपघात नाही,
तर प्रत्येक वाहनचालकासाठी एक गंभीर इशारा आहे.



