बरेलीत ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणांनी खळबळ; १४ जणांवर गुन्हा, ६ आरोपी ताब्यात

उत्तर प्रदेशातील बरेली शहरात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या कथित घोषणांमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गजबजलेल्या सदर बाजार परिसरात दुचाकींवरून आलेल्या तरुणांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातल्याचा आरोप असून, या प्रकरणी पोलिसांनी १४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी ६ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, दोन अल्पवयीन मुलांचाही त्यात समावेश आहे.
ही घटना रविवारी दुपारी बरेलीच्या कॅन्टोन्मेंट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सदर बाजार भागात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकींवरून आलेल्या काही तरुणांनी बाजार परिसरात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. अचानक झालेल्या या प्रकारामुळे बाजारपेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि अनेक दुकानदारांनी खबरदारी म्हणून दुकाने अंशतः बंद केली.
पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तातडीने तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, आतापर्यंत १४ आरोपींची ओळख पटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी काशिफ हा माजी नगरसेवक तहसीन याचा मुलगा असल्याचे समोर आले आहे. तो मौलाना तौकीर रजा यांच्या इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिल (IMC) या संघटनेशी संबंधित असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी काशिफच्या घरावर छापा टाकला, मात्र तो फरार असल्याचे आढळून आले.
स्थानिक नागरिक विकास यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास संगणक दुकानाजवळ उभे असताना क्रिकेट बॅट घेऊन दुचाकींवरून आलेल्या तरुणांच्या टोळीने घोषणाबाजी करत परिसरात प्रवेश केला. त्यांनी विरोध केल्यानंतर संबंधितांनी त्यांच्याशी गैरवर्तन करत मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार दोन नामनिर्देशित आरोपींसह अनेक अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीभर विविध ठिकाणी छापेमारी केल्यानंतर पोलिसांनी ६ आरोपींना ताब्यात घेतले.
दरम्यान, काशिफच्या घरावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर त्याच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने जमाव केला. यावेळी परिस्थिती तणावपूर्ण बनली आणि जमावाने पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर बरेली छावणी परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, सध्या कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक मानुष पारीक यांनी दिली. या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.



