AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

सिटी न्यूजच्या बातमीचा प्रभाव; मोरबाग विलासनगरातील तुंबलेले नाले अखेर स्वच्छ

अमरावती शहरातील मोरबाग विलासनगर प्रभाग क्रमांक ६ मधील पत्रकार कॉलनी परिसरात अखेर स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागला आहे. अनेक दिवसांपासून तुंबलेल्या नाल्यांमुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर निर्माण झालेला धोका आता दूर झाला असून, सिटी न्यूजच्या बातमीचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला आहे.

मोरबाग विलासनगर प्रभाग क्रमांक ६ अंतर्गत येणाऱ्या पत्रकार कॉलनी, विद्या भारती स्कूलसमोरील नाले अनेक दिवसांपासून तुंबलेल्या अवस्थेत होते. नाल्यांमध्ये साचलेली घाण, उघड्या प्लॉटमध्ये पडलेला कचऱ्याचा ढिग आणि अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे स्थानिक नागरिकांसह शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती.

या गंभीर प्रश्नाची सिटी न्यूजने सातत्याने दखल घेत प्रशासनाचे लक्ष वेधले. वारंवार बातमी प्रसारित करून हा प्रश्न समोर आणल्यानंतर प्रभाग क्रमांक ६ च्या महिला पार्षद रेखा पंजाबराव तायवाडे यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले.

आज पहाटे ६ वाजल्यापासूनच परिसरात स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. माजी पार्षद पंजाबराव तायवाडे यांच्या उपस्थितीत मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. यानंतर तुंबलेल्या नाल्यांची संपूर्ण साफसफाई करण्यात आली. नाल्यांमधील कचरा काढून परिसर स्वच्छ करण्यात आला आणि साचलेली घाण हटवण्यात आली.

या संपूर्ण कामावर पंजाबराव तायवाडे स्वतः उपस्थित राहून लक्ष ठेवत होते. त्यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम वेगाने पूर्ण झाल्याने स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त करत सिटी न्यूजचे आभार मानले.

सिटी न्यूजच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशासनाने घेतलेली ही तातडीची दखल कौतुकास्पद मानली जात आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधीने अशीच जबाबदारी घेतली, तर शहरातील स्वच्छतेचे अनेक प्रश्न सहज मार्गी लागू शकतात, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button