अमरावतीत महाराष्ट्र दिनी पोलिसांची मोठी कारवाई; २ लाखांहून अधिक किमतीचा अवैध दारूसाठा जप्त

अमरावतीत महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध दारू विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने विलास नगर परिसरातील एका घरावर छापा टाकत तब्बल दोन लाखांहून अधिक किमतीचा अवैध देशी-विदेशी दारूसाठा जप्त केला. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ मे २०२६ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विलास नगर परिसरात छापा टाकला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
या छाप्यात अशोक महावीर पटेल (वय ६०, रा. विलास नगर, अमरावती) यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात अवैध देशी व विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. आरोपीकडे विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेली विविध कंपन्यांची दारू, बिअर कॅन्स आणि बाटल्या आढळून आल्या.
जप्त केलेल्या मालामध्ये Royal Stag, Imperial Blue, Officers Choice, McDowell No.1, Magic Moments यांसारख्या नामांकित ब्रँडच्या शेकडो बाटल्यांचा समावेश आहे. तसेच Tuborg आणि Kingfisher बिअरचाही मोठा साठा पोलिसांनी हस्तगत केला.
या संपूर्ण कारवाईत एकूण २ लाख ४ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) आणि ६६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर ठाकरे करत आहेत.
अवैध दारू विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे. शहरातील बेकायदेशीर धंद्यांवर आळा घालण्यासाठी अशा कारवाया किती प्रभावी ठरतात, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.



