citynewsLatest NewsMaharashtra

श्रीदत्त शिखर संस्थानवर षोडशी कार्यक्रम भक्तीभावात संपन्न; आचार्य अवधेशानंदगिरीजी महाराजांची उपस्थिती

माहूर येथील श्रीदत्त शिखर संस्थानवर ब्रह्मलीन प.पू. महंत मधुसूदनजी भारती महाराज यांच्या प्रित्यर्थ आयोजित षोडशी कार्यक्रम रविवारी, 19 एप्रिल रोजी अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला आचार्य महामंडलेश्वर प.पू. अवधेशानंदगिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या महापूजेसाठी जुना आखाड्याचे आणि कुंभमेळा प्रमुख महामंत्री प.पू. श्रीहरी गिरीजी महाराज, प.पू. श्री प्रेम गिरीजी महाराज, सभापती प.पू. मोहन शास्त्रीजी महाराज यांच्यासह अनेक संत-महंत उपस्थित होते. धर्मसभेच्या व्यासपीठावर उपस्थित सर्व संतांचा संस्थानच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी आचार्य महामंडलेश्वर अवधेशानंदगिरीजी महाराज यांनी आपल्या प्रभावी आणि ओजस्वी वाणीतून सुमारे एक तास प्रवचन केले. त्यांच्या प्रवचनाचा हजारो दत्तभक्तांनी लाभ घेतला. त्यांनी अध्यात्म, सेवा आणि संतपरंपरेचे महत्त्व विषद करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

उल्लेखनीय म्हणजे, श्रीदत्त शिखर संस्थानचे ब्रह्मलीन महंत प.पू. मधुसूदनजी भारती महाराज यांचे 4 एप्रिल रोजी निधन झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महंत प.पू. डॉ. धनेश्वरजी भारती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या षोडशी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला साधू-संत, महंत आणि हजारो दत्तभक्तांची उपस्थिती होती. धर्मसभेनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. तसेच रात्री महापूजेचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी सकाळी काकडा आरतीने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान आलेल्या भाविकांसाठी संस्थानच्या वतीने उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. हजारो भक्तांनी मनोभावे सेवा करत कोणतीही अडचण भासू दिली नाही.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button