Accident NewscitynewsLatest NewsMaharashtraYavatmal

साखरा जवळ भीषण अपघात : बाप-लेकीचा जागीच मृत्यू, महिला गंभीर जखमी

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा-घाटंजी मार्गावर साखरा गावाजवळ भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत बाप आणि सहा महिन्यांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कुटुंबातील एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

१४ एप्रिलच्या रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास पांढरकवडा-घाटंजी मार्गावरील साखरा गावालगत ट्रक आणि चारचाकी स्विफ्ट डिझायर वाहनामध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, चारचाकी वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला.

या अपघातात साईकिरण गुरगुल्ला (वय ३२) आणि त्यांची अवघ्या सहा महिन्यांची मुलगी हंसिका साईकिरण गुरगुल्ला यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनुष्का साईकिरण गुरगुल्ला या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने यवतमाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा परिवार साखरा येथे माहेरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आला होता. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते आदिलाबादकडे परत जात असताना हा भीषण अपघात घडला आणि आनंदाच्या वातावरणावर दुःखाचा डोंगर कोसळला.

घटनेची माहिती मिळताच घाटंजी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर निखिल पुंडे, समाजसेवक मुज्जू पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी महिलेला त्वरित रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रवाना केले. तसेच दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटंजी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

या अपघातामुळे साखरा आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सणाच्या दिवशीच घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button