अमरावतीत महा-ई-सेवा केंद्रांवरून वाद चिघळला! नव्या मंजुरीला संघटनेचा तीव्र विरोध — प्रशासनाला इशारा

अमरावती जिल्ह्यात महा-ई-सेवा केंद्रांच्या नव्या मंजुरीवरून मोठा वाद पेटला असून, संबंधित संघटना आता आक्रमक भूमिकेत आली आहे. नवीन केंद्रांना मंजुरी देऊ नये, अशी ठाम मागणी करत संघटनेने न्यायालयापासून प्रशासनापर्यंत लढा उभारला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आधीच मोठ्या संख्येने महा-ई-सेवा केंद्र कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत नवीन केंद्रांना मंजुरी दिल्यास विद्यमान केंद्रांच्या व्यवसायावर परिणाम होईल, असा दावा अखिलस्तरीय महा-ई-सेवा व आधार केंद्र संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आला आहे.
या मुद्द्यावर संघटनेने नागपूर खंडपीठात याचिका दाखल करत न्यायालयीन लढाही सुरू केला आहे. तसेच, राज्यातील विविध मंत्री आणि शासकीय अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देऊन मंजुरी प्रक्रिया थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर, बुधवार (८ एप्रिल) रोजी संघटनेच्या प्रतिनिधींनी अमरावतीचे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले.
📌 संघटनेच्या प्रमुख मागण्या:
👉 नवीन महा-ई-सेवा केंद्रांना मंजुरी देऊ नये
👉 सुरू असलेली मंजुरी प्रक्रिया तात्काळ थांबवावी
दरम्यान, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
या प्रकरणामुळे अमरावतीत महा-ई-सेवा केंद्रांच्या मंजुरीवरून संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. आता प्रशासन यावर काय भूमिका घेणार आणि संघटना पुढे कोणती पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📺 अधिक अपडेट्ससाठी पाहत राहा — सिटी न्यूज



