AkolaCrime NewsLatest News

अकोल्यात दिवसाढवळ्या चाकू हल्ला; ‘धुरंधर २’ पाहून आलेल्या टोळीचा दहशतवाद, दोघे गंभीर

अकोला शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा थरारक प्रकार समोर आला असून कौलखेड परिसरात दिवसाढवळ्या चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘धुरंधर २’ चित्रपट पाहून परतलेल्या नशेखोर तरुणांच्या टोळीने अक्षरशः दहशत माजवत तिघांवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेत दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कौलखेडमधील श्रद्धानगर ३ भागात ही घटना घडली. नशेत धुंद असलेल्या या टोळीने हातात चाकू आणि लोखंडी पाईप घेत परिसरात दहशत निर्माण केली. अभिलाष अरविंद हिंगे (वय ३२) यांच्यावर टोळीने अमानुष हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे.

यानंतर आरोपींनी कौलखेड चौकात धुमाकूळ घालत रवी उर्फ छोटू ठाकरे (वय २४) याच्यावरही चाकूने सपासप वार केले. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा (LCB) घटनास्थळी दाखल झाली. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली आहेत. मात्र, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, नांदेडमध्ये याच ‘धुरंधर’ चित्रपटानंतर घडलेल्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील ही घटना समोर आल्याने अशा चित्रपटांचा तरुणांवर होणारा परिणाम हा चिंतेचा विषय ठरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button