पुण्यात ‘पोर्टर अँप’ मधून ड्रग्ज तस्करीचा भंडाफोड; अल्पवयीन मुलीच्या अपहरणातून उघडकीस धक्कादायक रॅकेट!

पुण्यातील गुन्हेगारीने पुन्हा एकदा धक्कादायक वळण घेतले असून, यावेळी तस्करांनी चक्क मोबाईल अँपचा वापर करून ड्रग्ज पुरवठ्याचे जाळे उभे केले होते. पुणे शहरातील उत्तमनगर परिसरात घडलेल्या एका अपहरण प्रकरणाच्या तपासातून हा मोठा खुलासा समोर आला आहे.
पोलिसांकडे अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर तपासाला वेग आला. आरोपीचा माग काढत त्याला अटक करण्यात आली. तपासादरम्यान त्याच्याकडून एमडी ड्रग्जच्या दोन पुड्या जप्त करण्यात आल्या. यानंतर त्याचा मोबाईल तपासला असता ‘पोर्टर अँप’ मधून चालणारे ड्रग्ज नेटवर्क समोर आले.
या अँप मध्ये तब्बल 300 जणांची यादी आढळून आली, ज्याच्या माध्यमातून आरोपी शांतपणे ड्रग्जची डिलिव्हरी करत होता. विशेष म्हणजे, कोणालाही संशय येऊ नये म्हणून डिलिव्हरी सेवांचा वापर करून तस्करी केली जात होती.
पोलिसांच्या चौकशीत आरोपीने महत्त्वाची माहिती उघड केली. या रॅकेटमध्ये एकूण 8 जणांचा सहभाग असल्याचे समोर आले असून, त्यापैकी 4 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 4 जण अजूनही फरार आहेत.
तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे — या रॅकेटची सुरुवात तुरुंगातूनच झाली होती. तुरुंगात असताना आरोपींची ओळख झाली आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी एकत्र येऊन अँपच्या माध्यमातून ड्रग्ज तस्करी सुरू केली.
सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या मागे आणखी मोठे मास्टरमाइंड असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरुणाईला नशेच्या विळख्यात अडकवणाऱ्या या रॅकेटचा पूर्णतः नायनाट होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



