उमरदरी गावात मोबाईल टॉवरला आग; नेटवर्क सेवा ठप्प, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वाशिम (मालेगाव तालुका) | प्रतिनिधी
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील उमरदरी गावात JO कंपनीच्या मोबाईल टॉवरमध्ये अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरातील मोबाईल नेटवर्क सेवा काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, टॉवरमधील ‘ओडिसी’ या महत्त्वाच्या यंत्रणेतून सुरुवातीला धूर निघताना दिसून आला. काही वेळातच हा धूर आगीत रूपांतरित झाला आणि संपूर्ण यंत्रणा ज्वाळांनी वेढली गेली. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोबाईल सेवा ठप्प झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणेकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी संबंधित कंपन्यांनी सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.



